बंद ‘लेसर शो’चा दणक्यात वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:03 AM2017-12-05T01:03:19+5:302017-12-05T01:04:21+5:30
सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर ५० लाख रुपये खर्च करून महापालिकेने कृष्णाकाठावरील वसंतदादा स्मारकाजवळ वर्षभरापूर्वी लेसर शो प्रकल्प उभारला होता. त्याचे उद््घाटनही दणक्यात करण्यात आले होते. पण उद््घाटनानंतर हा लेसर शो गायबच आहे. लेसर शोच्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत स्वाभिमानी विकास आघाडीने या शोच्या स्थळी पाच किलोचा केक कापून सोमवारी सायंकाळी अनोखे आंदोलन केले.
यावेळी स्वाभिमानीचे नगरसेवक गौतम पवार, सतीश साखळकर, बलदेव गवळी, विशाल पवार, अनिकेत खिलारे, अविनाश चौगुले, शेरसिंग ढिल्लो, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, बुधवंत निंबाळकर, उमेश देशमुख, सलमान खान, हेमंत शिंदे, चंद्रकांत काळे, मोहन चोरमुले, रियाझ जमादार, फझल कापूरवाले, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.
यासंदर्भात साखळकर, पवार म्हणाले, एकीकडे शहर खड्ड्यांत असताना, महापालिकेने वसंतदादा स्मारकाच्या ठिकाणी ५० लाख रुपये खर्चून कारंजा आणि लेसर शोचा प्रकल्प घेतला. परंतु खाबूगिरीला चटावलेल्या कारभाºयांनी हा लेसर शोचा फार्सच केला. लेसर शोवर सांगली शहराचा, जिल्ह्याचा इतिहास दाखवू, तेथे पर्यटनस्थळ करू, असाही डांगोरा पिटला. पण उद््घाटनानंतर प्रत्यक्षात वर्षभरात एकदाही लेसर शो झाला नाही. शासनाच्या निधीची उधळपट्टी कशाप्रकारे केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. याचा आम्ही केक कापून निषेध केला.
गौतम पवार म्हणाले, शहरातील मूलभूत समस्या तशाच असताना, निव्वळ लुटीसाठीच हा धंदा मांडण्यात आला. लेसर शोवर उधळपट्टी केली. पाण्याच्या चार पाईप लावून शेड उभारण्यात आले. परंतु उसन्या मोटारी आणि लेसर दिवेही उद्घाटनासाठी बसविले. परंतु चार दिवसांत पुन्हा ते तेथून काढून नेण्यात आले. त्यावेळीही आम्ही तक्रार केली, पण दखल घेतली नाही. आता वर्ष झाले तरी लेसर शोही नाही आणि सांगलीचा इतिहासही नाही. एकूणच हा ५० लाखांचा घोटाळा आहे. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू.