वडर काॅलनीतील बंद शाळा खासगी मंडळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:53+5:302020-12-25T04:21:53+5:30
शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील स.नं. २६४ अ मध्ये महापालिकेची प्राथमिक शाळा होती. ही शाळा सध्या बंद पडली आहे. ...
शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील स.नं. २६४ अ मध्ये महापालिकेची प्राथमिक शाळा होती. ही शाळा सध्या बंद पडली आहे. या शाळेतील विद्यार्थी अन्य शाळेकडे स्थलांतर करण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळेच्या खोल्या एका खासगी मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाकडून शाळेत व्यायामशाळा सुरू केली जाणार आहे. नगररचना विभागाकडून भाडेमूल्य निश्चित करून २९ वर्षे कराराने आणि दर तीन वर्षांनी २० टक्के भाडेवाढ करण्याच्या अटीवर ही शाळा मंडळाला भाड्याने दिली जाणार आहे. तसा ठराव १६ जुलैच्या महासभेत उपसूचनेद्वारे करण्यात आला आहे.
यापूर्वी बंद जकात नाके भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला होता, पण आयुक्तांनी हा डाव उधळून लावला. ई लिलाव पद्धतीने जागा भाड्याने देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ही शाळा परस्परच भाडेतत्त्वावर दिली जाणार की त्याचाही ई लिलाव होणार असा प्रश्न आहे. या परिसरात अंगणवाडी असून तिला जागा उपलब्ध नाही. अंगणवाडीसाठी अनेकदा महापालिकेकडे जागा मागण्यात आली, पण ती देण्यात आली नाही. मात्र, प्रशासनाने शाळेची जागा खासगी मंडळाला देण्यासाठी तत्परता दाखविली आहे. सत्ताधारी भाजपच्या काळात उत्पन्नासाठी शाळाही भाड्याने देण्याची वेळ आल्याची टीका होऊ लागली आहे.
चौकट
ठराव विखंडित करा : साखळकर
ऑनलाईन महासभेत उपसूचनेद्वारे अनेक जागा, जकात नाके आणि आता शाळेच्या इमारती भाडेतत्त्वावर देण्याचे ठराव करण्यात आले आहे. या जागा हडपण्याचा डाव दिसून येतो. त्यामुळे आयुक्तांनी हे सर्व ठराव रद्द करावेत, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे.