महावितरणचा ‘शॉक’, वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्राचे वीज अनुदान बंद; उद्योजकांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:05 PM2022-03-02T17:05:43+5:302022-03-02T17:06:15+5:30

राज्य शासन व महावितरणचा योग्य समन्वय नसल्याने उद्योजक अडचणीत आले असल्याचा उद्योजकांचा आरोप

closure of power subsidy to industrial sector including textile industry | महावितरणचा ‘शॉक’, वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्राचे वीज अनुदान बंद; उद्योजकांत खळबळ

महावितरणचा ‘शॉक’, वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्राचे वीज अनुदान बंद; उद्योजकांत खळबळ

Next

विटा : महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे वीज दर सवलत अनुदान तातडीने बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योजकांना महावितरणचा मोठा ‘शॉक’ बसला असून उद्योग जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्य शासन व महावितरणचा योग्य समन्वय नसल्याने उद्योजक अडचणीत आले असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.

राज्यातील वस्त्रोद्योगासह औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना चालना व उद्योजकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्यावतीने उद्योगांना वीज दर सवलत अनुदान देण्यात येत होते. मात्र, राज्य शासनाच्या अर्थ विभागाने आवश्यक ती तरतूद अंदाजपत्रकात न केल्याने व महावितरणला या अनुदानापोटी द्यायचा निधी न दिल्याने महावितरणने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे शासनाने दीर्घकालीन धोरणांतर्गत घेतलेले असे अनुदानाचे निर्णय एका रात्रीत बंद करण्याच्या महावितरणच्या प्रकाराने उद्योग क्षेत्रात प्रचंड नाराजी व संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली असून उद्योजकांनी या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हे वीज सवलत अनुदान बंद

महावितरणच्या निर्णयामुळे विदर्ग मराठवाडा अनुशेष अनुदान, सामुहित प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत डी व डीप्लस क्षेत्रासाठी लागू असलेले वीज दर अनुदान, वस्त्रोद्योग धोरणांतर्गत लागू असलेले अनुदान हे सर्व वीज सवलत अनुदान पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ या महिन्यांतील औद्योगिक ग्राहकांची वस्त्रोद्योग घटकांची वीज बीले विनाअनुदान वितरीत करण्याच्या सूचना महावितरणचे वाणिज्य मुख्य अ•िायंता यांनी सर्व अधिकारी व बिलींग विभागाला दि. १ मार्च रोजी दिल्या आहेत.

उद्योग स्थलांतरणाचा धोका

अशा प्रकारामुळे एवढ्या अनिश्चित वातावरणात राज्यात उद्योग चालविणे केवळ अशक्य असून या निर्णयाने राज्यातील उद्योग क्षेत्र बंद पडून इतर राज्यात स्थलांतर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने लक्ष घालून वीज दर सवलत अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केली.

Web Title: closure of power subsidy to industrial sector including textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.