ढग हटले, तापमान वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:21+5:302021-01-13T05:06:21+5:30
सांगली : जिल्ह्याच्या डोईवरचे ढग हटले असून आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार आगामी आठवडाभर थंडी ...
सांगली : जिल्ह्याच्या डोईवरचे ढग हटले असून आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार आगामी आठवडाभर थंडी गायब राहणार आहे.
जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात साेमवारी वाढ झाली. कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या सहा दिवसांत किमान तापमान २१ अंशावर तर कमाल तापमान ३३ अंशापर्यंत वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी गायब होऊन साधारण तापमानाचा अनुभव नागरिकांना येणार आहे. जानेवारीतील पहिले दहा दिवस तापमानाच्या चढ-उताराचे राहिले. ढगाळ वातावरणासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसही पडला. शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे चिंता निर्माण झाली होती. आता ही चिंता दूर झाली असून आगामी सहा दिवस आकाश निरभ्र राहणार आहे.
जानेवारी महिन्यातील आजवरच्या सरासरी तापमानाचा विचार केल्यास कमाल तापमान २ अंशाने तर किमान तापमान ६ अंशाने अधिक आहे. त्यामुळे थंडी जाणवत नाही. ना थंडी ना फारसा उकाडा अशा साधारण तापमानाचा अनुभव अजून काही दिवस नागरिकांना येईल.