सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:28 AM2021-01-03T04:28:16+5:302021-01-03T04:28:16+5:30
सांगली : जिल्ह्यात हवामानात शनिवारी अचानक बदल झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार सांगलीसह ...
सांगली : जिल्ह्यात हवामानात शनिवारी अचानक बदल झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार सांगलीसह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात तुरळक पावसाची शक्यता आहे.
जिल्ह्यात नव्या वर्षाची सुरुवात हवामानाच्या लहरीपणाने सुरू झाली आहे. शुक्रवारी १ जानेवारीस थंडी व तापमान सरासरीच्या आसपास होते. शनिवारी अचानक तापमानात वाढ होऊन ढगांची दाटीही झाली. शनिवारी किमान तापमान १८, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दुसरीकडे सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ सूर्यदर्शन झाले आणि पुन्हा सायंकाळी ढगाळ वातावरण होते.
रविवारी अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर तीन दिवस आकाश निरभ्र राहील. त्यानंतर ७ व ८ जानेवारी रोजी विजांचा कडकडाट किंवा तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या काळात तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १६ ते १८, तर कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची व मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनेही वर्तविली आहे.