जिल्ह्यात कडकडीत बंद

By admin | Published: June 6, 2017 12:05 AM2017-06-06T00:05:45+5:302017-06-06T00:05:45+5:30

शहरातही प्रतिसाद : सर्वपक्षीय मोर्चा, निदर्शने, पुतळा दहन

Clutches in the district | जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यात कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क--सांगली : शेतकऱ्यांच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा म्हणून सोमवारी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चे, निदर्शने, पुतळा दहन तसेच दूध पुरवठा रोखण्याचे प्रकार संपाच्या पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. शहरात भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यात सोमवारी आंदोलनात शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते, हातगाडीवाले, हमाल अशा सर्वच घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यातील बाजारपेठांमधील कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, खानापूर, जत, आटपाडी, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील छोट्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. मिरज, इस्लामपूर, विटा या शहरांतील बाजारपेठ दिवसभर बंद राहिली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावर्डे येथे दूध ओतून, टायर पेटवून शासनाचा निषेध करण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी येथे मिरज-पंढरपूर मार्गावर वाहतूक रोखण्यात आली. पलूस तालुक्यात कुंडल, भिलवडी, अंकलखोप, आमणापूर, रामानंदनगर येथे क्रांती मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.
सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, जनता दल, शेकाप, किसान सभा, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हमाल पंचायत, शहर सुधार समिती यांचा सहभाग होता. शहरातील मार्केट यार्ड, विष्णुआण्णा फळमार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तेथील आवक-जावक पूर्णत: ठप्प झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह सांगली, मिरज शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दूध पुरवठ्यावर परिणाम
गेल्या पाच दिवसात सांगली जिल्"ातील एकूण दूध संकलनात सुमारे १३ लाख लिटर दुधाची घट झाली असून सोमवारी संपाच्या दिवशीही दूध पुरवठ्यावर ६0 टक्के परिणाम दिसून आला.

पुन्हा पुतळ््यांचे दहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ््याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दहन करण्यात आले. अनेकठिकाणी या नेत्यांविरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.

सांगलीत २५ कोटींची उलाढाल ठप्प
सांगलीतील मार्केट यार्ड, विष्णुआण्णा फळमार्केटसह गणपती पेठ, सराफ पेठ, कापड पेठ, हरभट रस्ता, मारुती रस्ता या मुख्य बाजारपेठांमधील व्यवहार दिवसभर बंद होते. त्यामुळे सुमारे २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. संपकाळात बाजार समितीवर झालेल्या परिणामाचा विचार करता एकूण ४५ ते ५0 कोटींंचा फटका सांगलीतील बाजारास बसला आहे.


कडेगाव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद. अंबक येथे रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको.
मिरज तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. आरग येथे मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतिमेचे दहन.
वाळवा तालुक्यात बंदमुळे भाजीपाला विक्री आणि दूध संकलन ठप्प. इस्लामपूरचा भाजी बाजार ओस. कामेरी, पेठ येथे बंद.
कोठे, काय झाले...
विटा शहरासह खानापूर तालुक्यात व्यापाऱ्यांनी बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला.
कुंडल परिसरात शेतकरी क्रांती प्रचार फेरी.
कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यातील बारा गावांमध्ये कडकडीत बंद. शिरढोण, लांडगेवाडी, अलकूड (एस) येथे राज्यमार्गावर रास्ता रोको.
तासगाव तालुक्यात मांजर्डे, मणेराजुरी येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन. अनेक ठिकाणी दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतले.
संख (ता. जत) येथील सोमवारचा आठवडा बाजार बंद. गाव बंद. शेगाव परिसरात रास्ता रोको.
शिराळा तालुक्यात व्यवहार बंद.
आटपाडी तालुक्यात बंद यशस्वी.

Web Title: Clutches in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.