इस्लामपूर पालिकेत गोंधळ
By admin | Published: March 1, 2017 12:28 AM2017-03-01T00:28:47+5:302017-03-01T00:28:47+5:30
अभूतपूर्व गदारोळात सभेचे कामकाज गुंडाळले; २०२ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८ चा २०२ कोटी ७३ लाख रुपयांच्या आणि ५३ हजार रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंगळवारी सत्ताधारी विकास आघाडीने १४ विरुद्ध ० मतांनी मंजुरी दिली.
सभेला सुरुवात झाल्यावर विरोधी राष्ट्रवादी सदस्यांनी अर्थसंकल्पावर बोलू दिले नसल्याचा आरोप केला, तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी करवाढ नसलेला आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मताला टाकल्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य तटस्थ राहिल्याने १४-० अशा मतांनी रीतसर मंजूर केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आक्रमक राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या शहाजी पाटील यांनी लिपिकाकडील हजेरी पुस्तक ताब्यात घेऊन बाहेर आणल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत मुख्याधिकारी दालनातच काही वेळ रणकंदन माजले.
अण्णासाहेब डांगे सभागृहात मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पीय विशेष सभा झाली. यावेळी सभागृहात ३० सदस्य उपस्थित होते. सभेला सुरुवात करण्यापूर्वी कोरम पूर्ण झाल्याची खात्री नगराध्यक्षांनी केली. २३ सदस्यांच्या हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी झाल्याने त्यांनी प्रशासनाला विषय वाचन करण्याची सूचना केली. यादरम्यान विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपनगराध्यक्षांना खाली बसविल्याचा मुद्दा घेत सत्ताधाऱ्यांनी परंपरा मोडल्याचा आरोप केला. त्यातच नगराध्यक्ष पाटील यांनी विषयाचे वाचन झाल्यावर अर्थसंकल्पावरील सूचनांबाबत विचारणा केली.
विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी अर्थसंकल्पाची नोटीस व प्रत सात दिवस अगोदर मिळाल्याने वाचन झाले आहे. शहर विकासाच्या या अर्थसंकल्पाला मंजुरी द्यावी, अशी सूचना मांडली. नगराध्यक्ष पाटील यांनी ही सूचना मताला टाकली. त्यावेळी विकास आघाडीच्या १४ सदस्यांनी हात वर केला, तर इतर सदस्य तटस्थ राहिल्याने १४-० अशा मतांनी हा अर्थसंकल्प गोंधळातच मंजूर झाला. राष्ट्रगीत होऊन सभा संपल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केल्यावर पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे शहाजी पाटील हजेरी पुस्तक घेऊन सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ विकास आघाडीचे विक्रम पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार यांच्यासह राष्ट्रवादीचेही सदस्य धावले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अॅड. चिमण डांगे यांनी हे हजेरी पुस्तक ताब्यात घेऊन ते महिला सदस्यांकडे दिले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. (प्रतिनिधी)
हजेरी पुस्तक पळवून नेल्याचा आरोप
अर्थसंकल्पीय सभेनंतर सदस्यांचे हजेरी पुस्तक सभागृहाबाहेर आल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास शहाजी पाटील, अॅड. चिमण डांगे यांच्यासह महिला सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हे हजेरी पुस्तक बाहेर सापडले आहे, असे सांगून ते मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हे हजेरी पुस्तक पळवून नेल्याचा आरोप विकास आघाडीच्या सदस्यांनी केला.