सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर

By संतोष भिसे | Published: September 29, 2022 01:38 PM2022-09-29T13:38:44+5:302022-09-29T13:39:23+5:30

पुढील टप्प्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पीएनजी प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रयत्न सुरु आहेत.

CNG sales of Sangli, Satara reached 10 thousand kg | सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर

सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर

Next

सांगली : सांगली आणि सातारा जिल्ह्यांना वाहनांसाठी सीएनजी पुरविणारे येलूर (ता. वाळवा) येथील उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे पुरेसा सीएनजी उपलब्ध होऊ लागला आहे. सध्या दोन्ही जिल्ह्यांतील १४ पंपांवरुन दररोजची विक्री १० हजार किलोंवर पोहोचली आहे.

भारत पेट्रोलियमद्वारे सीएनजी पुरवठ्याचा प्रकल्प गतीने पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात वाहनांसाठी गॅसची योजना प्रत्यक्षात आली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, कासेगाव, येलूर, वाघवाडी व समडोळी येथील पंपांवर सीएनजीची विक्री पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. कर्नाल (ता. मिरज) येथील पंप ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल. त्याशिवाय पुणे-बेंगलुरु महामार्ग व सातारा जिल्हा मिळून एकूण १४ पंपांवर विक्री पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. आतापर्यंत टॅंकरमधून पंपांना सीएनजी पुरविला जायचा. मागणीइतके टॅंकर उपलब्ध नसल्याने टंचाई निर्माण व्हायची. पंपांवर टॅंकर येताच काही तासांतच सीएनजी संपायचा, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.

सध्या टंचाई संपुष्टात आली आहे. येलूर येथील उपकेंद्रावर ३० टॅंकर उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी नोंदविताच टॅंकर उपलब्ध होत आहेत. गॅससाठी रांगा लावाव्या लागत नसल्याचे चित्र आहे. दाभोळहून बेंगळुरुला जाणाऱ्या गॅस वाहिनीमधून येलूर उपकेंद्रासाठी पुरवठा घेण्यात आला आहे, त्यामुळे मुबलक पुरवठा होत आहे.

आता घरगुती पुरवठ्यासाठी प्रयत्न

पुढील टप्प्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पीएनजी प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रयत्न सुरु  आहेत.  महापालिका क्षेत्रात १२ हजार २०७ घरांत जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. तेथे गॅस पुरवठ्यासाठी मिरजेतील उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तोपर्यंत येलूर उपकेंद्रातून पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: CNG sales of Sangli, Satara reached 10 thousand kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली