कोकरुडची पाणी योजना आठ वर्षांपासून बंद...
By Admin | Published: January 23, 2015 12:28 AM2015-01-23T00:28:50+5:302015-01-23T00:40:40+5:30
ग्रामपंचायत उदासीन : लाखो रुपये पाण्यात
संजय घोडे-पाटील -कोकरुड (ता. शिराळा) येथे भारत निर्माण योजनेतून सुमारे १६ लाख रुपये खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना आठ वर्षांपासून सुरू होण्याआधीच बंद अवस्थेत आहे. याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत.
येथील गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गवळोबा रस्त्यानजीक कचऱ्याचा मोठा ढीग साठला आहे व बाजूलाच स्वच्छतागृह नसल्याने एका पडक्या भिंतीच्या बाजूचा परिसर गलिच्छ केला आहे. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असून, ही हद्द माळेवाडी-कोकरुड यामध्ये येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. गावाला स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने येथील जि. प. शाळेपाठीमागे उभी केलेली पाण्याची टाकी उभारतानाच कलली होती. शेजारील फिल्टर टँक गंजून गेला आहे. नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणारी पाईपलाईनही अपुऱ्या अवस्थेत आहे. तरीही शासनाचा या कामामधील लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी संगनमताने लाटला आहे. ही योजना अपुरी असतानाही ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतलीच कशी? तिला काम पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट (अहवाल) कोणी दिला? त्याचे बिल मंजूर झालेच कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गावाला शासनाच्या विविध निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये मिळाले आहेत. त्यामधून चार/चार पाणी योजना असतानाही पिण्यासाठी पुरसे पाणी उपलब्ध नाही. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संगनमताने शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घातला आहे. चार वर्षापूर्वी संजय शिवाजी घोडे (मायकल) या तरुणाने शोले स्टाईलने या पाण्याच्या टाकीवर चढून अभिनव आंदोलन केले होते. राजकीय कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गावातील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाची दुरवस्था झाल्यामुळे परिसरातून येणारी मंडळी, प्रवासी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय व जनावरांच्या दवाखान्याच्या भिंतीचा आधार घेऊन दुरुपयोग करीत आहेत. बसस्थानक परिसर व कोकरुड-मलकापूर रस्त्यावर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. तळे परिसर, चौगुले कॉर्नर, नांगरवाडा, खंदक, हरिजन वस्ती आदी ठिकाणी अशीच स्थिती आहे.
विकास कामात लाखोंचा भ्रष्टाचार
ग्रामपंचायतीने शासनाच्या पर्यटन निधीतून काँक्रिटीकरण, नाले व पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत. मात्र अनेक गल्लीतील कामे अपूर्ण आहेत. जलशुध्दीकरण योजना मंजूर होऊन पूर्ण झाली, त्यावेळी वेगळे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी असल्याने याबाबत झालेल्या घडामोडींची आपल्याला काहीही कल्पना नाही. कोकरुड गावात झालेल्या अनेक विकास कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांंचा आरोप आहे.