कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता, त्वरित कामे सुरू करा - पालकमंत्री खाडे
By संतोष भिसे | Published: October 6, 2022 05:27 PM2022-10-06T17:27:22+5:302022-10-06T18:04:56+5:30
स्थगिती असलेल्या लोकोपयोगी कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. लोकोपयोगी कामे आचारसंहितेत अडकू नयेत यासाठी त्वरित सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले. स्थगिती असलेल्या लोकोपयोगी कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.
खाडे म्हणाले, अंगणवाड्यांना जागा नसल्यास जिल्हा परिषद शाळा, गायरान, ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या मोकळ्या जागांचा विचार करावा. अंगणवाडीजवळ ओढे, नाले, कालवे, विहिरी असल्यास तेथे संरक्षण भिंती बांधाव्यात. दलित वस्त्यांसाठीचा निधी तेथेच खर्च झाला पाहिजे. लम्पीची नुकसान भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांना द्यावी. पाटबंधारे, लघुपाटबंधारेसाठीच्या भूसंपादनाच्या थकीत भरपाईचा आढावा त्वरित घ्यावा. शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदी सर्व अवैध धंदे त्वरित बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी कठोर कारवाई करावी.
मिरजेत कृष्णाघाटावरील मंदिराचे काम निधी देऊनही रखडल्याबद्दल खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाचे कौतुक केले.
महत्वाचे निर्णय दृष्टिक्षेपात...
- अंगणवाडी बांधकामासाठी आठ लाखांऐवजी ११ लाख २५ हजार रुपये
- २५:१५ योजनेची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाममार्फत
- शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब उभारणार
- प्राथमिक शिक्षकांची रिक्त ८०० पदे महिन्याभरात भरणार
मिरज सिव्हिलमध्ये कर्करोगावर उपचार
खाडे म्हणाले, मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्रणेसाठी नियोजन समितीमधून निधी दिला जाईल. कर्करोगावरील उपचारांसाठीही आधुनिक सुविधांसाठी पाठपुरावा केला जाईल.