मालगावात थंडी-तापाचे रुग्ण वाढले

By admin | Published: November 9, 2014 10:49 PM2014-11-09T22:49:34+5:302014-11-09T23:29:14+5:30

सरपंचांची माहिती : आरोग्याच्या सर्व्हेत डेंग्यूची साथ नाही

Cold diseases increase in Malgav | मालगावात थंडी-तापाचे रुग्ण वाढले

मालगावात थंडी-तापाचे रुग्ण वाढले

Next

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या सर्व्हेक्षणात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नसल्याने गावात डेंग्यू साथ नसल्याची माहिती सरपंच प्रदीच सावंत व ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर व वैद्यकीय अधिकारी ए. ए. पवार यांनी दिली.
मालगाव येथे सानिका कांबळे या मुलीला डेंग्यूसदृश साथीची लागण झाल्याच्या शक्यतेने तालुका वैद्यकीय विभागाने आरोग्य सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय अधिकारी सौ. वंदना धेंडे व ए. ए, पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालगाव, खंडेराजुरी व एरंडोली या आरोग्य केंद्रांतील १६ कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व्हे केला.
यामध्ये हवामान बदलानुसार किरकोळ ताप, थंडी व कणकण असे रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही साथ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरात साचलेल्या पाण्यात डास निर्मूलनाचे उपाय म्हणून गप्पी मासे सोडणे व जळक्या तेलाचा वापर केला आहे. त्याचबरोबर घरात साठवणूक केलेल्या पाण्यात अळ्या होऊन त्याचे रूपांतर डास उत्पत्तीत होत असल्याने ग्रामस्थांना साठवणूक केलेले पाणी रिकामे करण्यास भाग पाडले. आठवड्यातून एकवेळ तरी कोरडा दिवस पाळावा यासाठी सक्तीही करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनेही गावात औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबविली आहे.
गावात १७० कूपनलिका आहेत. पैकी पाणी पिण्यायोग्य असलेल्या ५५ कूपनलिकांमध्ये पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएलचा वापर केला आहे. दर्गा परिसरातील विहिरीतही पाणी शुध्दीकरणाची उपाययोजना मालगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीने केली आहे.
दि. १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत बावाफन उरूस साजरा होत असल्याने उरूसात आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. गावात डेंग्यू साथ नाही, तरीही आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच प्रदीप सावंत व ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर यांनी केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब धामणे, राजू भानुसे, जुबेदाबी मुजावर उपस्थित होते. (वार्ताहर)

डेंग्यू साथ नाही : पवार
मालगाव येथे आरोग्य तपासणी मोहिमेत एकही डेंग्यू अथवा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेला नाही. गावात अशाप्रकारची साथ येऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. ग्रामस्थांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर डास उत्पत्तीला वाव मिळू नये यासाठी साठवलेले पाणी आठवड्यातून एक वेळ पूर्णत: रिकामे करून कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मालगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ए. ए. पवार यांनी केले आहे.

Web Title: Cold diseases increase in Malgav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.