कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार

By Admin | Published: May 17, 2014 12:14 AM2014-05-17T00:14:57+5:302014-05-17T00:16:11+5:30

सांगली : शेकापने केलेला १९५७ चा एकमेव पराभव वगळता सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष अपराजित राहिला होता. विरोधकांनी काँग्रेसचा पाडाव

The collapse of the Congress | कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार

कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार

googlenewsNext

 सांगली : शेकापने केलेला १९५७ चा एकमेव पराभव वगळता सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष अपराजित राहिला होता. विरोधकांनी काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी केलेल्या अनेक राजकीय खेळ्या अपयशी ठरल्या होत्या. मात्र ५८ वर्षांपासून अभेद्य असलेला हा बालेकिल्ला भाजपच्या धक्क्याने यंदा ढासळला. मोठ्या फरकाने भाजपने निवडणूक जिंकल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्यावेळी १९५७ मध्ये काँग्रेसविरोधी लाट आली होती. त्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये पुन्हा काँग्रेसविरोधी लाट आली, मात्र त्या लाटेतही सांगलीचा बालेकिल्ला काँग्रेसकडेच राहिला होता. प्रतिकूल परिस्थितीतही हा गड अभेद्य राहिला. २००९ मध्ये तर भाजप, शिवसेना, राष्टÑवादी आणि इतर पक्षांनी अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांच्यामागे ताकद उभी केली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांनी ३९ हजार मताधिक्याने ही जागा राखली होती. यंदा मात्र भाजपने काँग्रेसला दुसरा ऐतिहासिक दणका देत बाजी मारली. हा ऐतिहासिक विजय असल्यानेच जिल्हाभर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण दिवसभर सुरू होती. फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सांगली-मिरजेत शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा केला. संजय पाटील यांना जत, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ या तालुक्यांतून मोठे मताधिक्य मिळेल, असे तर्क लढविले जात होते, मात्र सर्वच तालुक्यांतील मतदारांनी यंदा भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मते टाकली. आम आदमी पार्टीच्या उमेदवार अ‍ॅड. समीना खान, जनता दलाचे अ‍ॅड. के. डी. शिंदे यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नानासाहेब बंडगर यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळून ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रा. नितीन सावगावे ८४०५ मते मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले. राजकीय तज्ज्ञांचे अंदाज, तर्कवितर्कांना धक्का देणारा निकाल सांगली लोकसभा मतदारसंघात लागला. याचीच चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The collapse of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.