अडिचशे वर्षाच्या इतिहासाच्या माहितीचा संकलन, सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:50 PM2019-03-14T12:50:02+5:302019-03-14T12:51:05+5:30
श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सांगलीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा सुमारे अडिचशे वर्षांचा इतिहास जाणून घेतला. विद्यार्थिनींचा हा ह्यहेरिटेज वॉकह्ण सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर घडविणारा ठरला.
सांगली : श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सांगलीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा सुमारे अडिचशे वर्षांचा इतिहास जाणून घेतला. विद्यार्थिनींचा हा ह्यहेरिटेज वॉकह्ण सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर घडविणारा ठरला.
गरवारे कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व मोडी प्रशिक्षण वगार्मार्फत या इतिहास अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख प्रा. उर्मिला क्षीरसागर आणि मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.
अनेकजण राज्यातील, देशातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात. पण, आपल्याच जिल्हयाचा, गावाचा इतिहास माहिती नसतो. हा स्थानिक इतिहास जाणून घेण्यासाठी या आगळ्या वेगळ्या सफरीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातंर्गत विद्यार्थिनीना गणेशदुर्ग भुईकोट किल्ला, किल्ल्यामध्ये असणारा दरबार हॉल, संस्थानकालीन प्रशासकीय इमारती, बुरुज, खंदक, काटे दरवाजा अशा विविध वास्तू दाखविण्यात आल्या.
या वास्तूंची माहिती इतिहास अभ्यासक कुमठेकर यांनी दिली. सांगलीचा इतिहास, पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे कार्य, गणेश दुर्ग किल्ल्याचा इतिहास, राजवाडा परिसरात असणारे ऐतिहासिक अवशेष यांची माहिती कुमठेकर यांनी दिली. मराठा कालीन बांधकामाची वैशिष्टये, लाकडावरील कोरीव काम, संस्थानकालीन इमारतीवर असणारा ब्रिटीश स्थापत्य शैलीचा प्रभाव अशी माहिती या वेळी देण्यात आली.
राजवाडा परिसरात असणाऱ्या सांगली वस्तू संग्रहालयालाही भेट देण्यात आली. तेथील ऐतिहासिक व कलात्मक वस्तू, नामवंत चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचा ताम्रपट, सवाई माधवराव पेशव्यांचे जोडे, चंदनाच्या लाकडावरील कोरीव काम अशा नानाविध ऐतिहासिक वस्तू पाहून विद्यार्थिनी थक्क झाल्या. सांगली शहर आणि परिसरात गेल्या २५० वर्षांत झालेल्या ऐतिहासिक घटना, घडामोडीची माहिती सांगणारा हा एक ह्यहेरिटेज वॉकह्ण च होता. भूतकाळाची रम्य सफर या अभ्यास सहलीतून विद्यार्थिनींना घडली.