पद्माळेत रंगला सामूहिक चिखलस्नानाचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:18 PM2018-11-11T23:18:08+5:302018-11-11T23:18:14+5:30
सांगली : नदी, तलाव, विहिरीच्या पाण्यात सामूहिक स्नानाचे चित्र सर्वांना परिचित आहे. पण पद्माळे (ता. मिरज) येथे रविवारी सामूहिक ...
सांगली : नदी, तलाव, विहिरीच्या पाण्यात सामूहिक स्नानाचे चित्र सर्वांना परिचित आहे. पण पद्माळे (ता. मिरज) येथे रविवारी सामूहिक चिखलस्नानाचा अनोखा उपक्रम पार पडला. या उपक्रमात गावातील तरुण मुले, शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.
देशभर रविवारी विविध उपक्रमांनी निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील इंटरनॅशनल नेचरोपेथी आॅर्गनायझेशन या संस्थेने मातीस्नानाच्या जागतिक विक्रमाचा संकल्प केला आहे. याअंतर्गत सांगलीच्या पद्माळे येथील जय भगवान युवक मित्रपरिवाराच्यावतीने मातीस्नानाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गाावातील कृष्णा नदीकाठी हा मातीस्नानाचा सोहळा रंगला होता. नदीकाठच्या तांबूस मातीचा आरोग्यदायी लेप अंगाला लावत पूर्ण चिखलात रंगून पन्नासहून अधिक लोक यात सहभागी झाले होते. यामध्ये शाळकरी मुले, तरुण तसेच वृद्धांनीही सहभागी होत या अनोख्या स्नानाचा आनंद लुटला. चिखलस्नानाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने नदीकाठी जमले होते.
महाराष्टÑात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्यात येते. तोसुद्धा चिखल, राखेत रंगण्याचा दिवस असतो, पण त्याच्या पुढे एक पाऊल टाकत नदीकाठच्या तांबूस मातीचा संपूर्ण शरीराला लेप लावत हा उपक्रम राबविण्यात आला.
वायू , जल, भूमी, निसर्ग अशा मिलाफाच्या पंचतत्त्व मातीस्नानाचा अनुभव यावेळी मोठ्या उत्साहात घेण्यात आला.
माती आरोग्यदायी!
येथील मोहन जगताप यांनी सांगितले की, प्राचीन युगापासून माती ही आयुर्वेदिक उपचारासाठी वापरली जाते आणि शरीराच्या अनेक व्याधी या मातीमुळे दूर होतात. त्यामुळे मातीचा प्रसार, प्रचार व्हावा आणि मातीचे आयुर्वेदिक महत्त्व कळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.