सांगली जिल्हा बँक संचालकांचे सामूहिक राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:30 PM2018-08-22T16:30:24+5:302018-08-22T17:02:54+5:30
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले.
सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न संचालकांनी केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही.
दिलिप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्य झाल्याचे कारण या राजीनामापत्रात दिले आहे. प्रत्यक्षात यामागे नोकरभरतीचे कारण असल्याची चर्चा आहे. नोकरभरतीत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, अशी भूमिका दिलिप पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढत आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी कालच त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातत्याने दिलीप पाटील यांना पाठबळ दिल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकरभरतीला प्रतिसाद नसल्याची संचालकांत जोरदार चर्चा आहे. राज्यातील पाच जिल्हा बॅंकांतील नोकरभरती केली. मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केल होते. नोकरभरतीची प्रक्रिया सुरु करु असे केवळ आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यातून असंतोष होता. अखेर काल रात्री एकाचवेळी राजीनामे देण्यात आले.
दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सांगितले की, माझ्याकडे संचालकांचा लिफाफा आला आहे तो मी अजून फोडलेला नाही. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जयंत पाटील निर्णय घेतील - अध्यक्ष
बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की राजीनाम्यांबद्दल मला काही माहित नाही. मी नेहमीच बँक हिताचे निर्णय घेतलेत. म्हणून बँक राज्यात क्रमांक एकवर आहे. मला जयंत पाटील यांनी अध्यक्ष केल्याने पदाबाबत तेच योग्य निर्णय घेतील.