जिल्हाधिकारीसाहेब, रेमडेसिविर वापराचे ऑडिट एकदाचे कराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:09+5:302021-04-28T04:29:09+5:30

सांगली : रेमडेसिविर हे प्राण वाचविणारे इंजेक्शन नसल्याचे आरोग्य प्रशासन वारंवार सांगत आहे, तरीही खासगी कोविड रुग्णालयांतून इंजेक्शनसाठीच्या चिठ्ठ्या ...

Collector, audit the use of Remedesivir once and for all! | जिल्हाधिकारीसाहेब, रेमडेसिविर वापराचे ऑडिट एकदाचे कराच!

जिल्हाधिकारीसाहेब, रेमडेसिविर वापराचे ऑडिट एकदाचे कराच!

Next

सांगली : रेमडेसिविर हे प्राण वाचविणारे इंजेक्शन नसल्याचे आरोग्य प्रशासन वारंवार सांगत आहे, तरीही खासगी कोविड रुग्णालयांतून इंजेक्शनसाठीच्या चिठ्ठ्या रुग्णांच्या नातेवाइकांना दिल्या जात आहेत. त्यामुळे रेमडेसिविर वापराचे ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांची सेवाभावी वृत्ती कमी होऊन व्यावसायिकता आल्याचे स्पष्ट करणाऱ्या तक्रारी येत आहेत. अतिरिक्त बिलाबद्दल लेखा विभागाने नोटिसा धाडल्याने हे स्पष्ट होत आहे. आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या वापराविषयी तर खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच बोट दाखविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविरच्या वापराचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे. रेमडेसिविरबाबत पहिल्या लाटेपेक्षा सध्याच्या लाटेत अधिक गंभीर स्थिती आहे. मिरज कोविड रुग्णालयात दोघेजण सापडल्यानंतर यापूर्वीच्या वापराविषयी शंका उपस्थित होत आहेत. रेमडेसिविर वापराविषयी जिल्हाधिकारी संयमाची आवाहने करत असले तरी रुग्णालयातून चिठ्ठी येते तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांना पर्यायच राहत नाही.

काही खासगी कोविड रुग्णालयांत डॉक्टरांच्या राऊंडनंतर कर्मचाऱ्यांचेच वॉर्डवर नियंत्रण असते, या स्थितीत इंजेक्शन प्रत्यक्ष दिल्यासंदर्भात कोणतीही सत्यता असत नाही. यातूनच काळाबाजार फोफावतो. यावर नियंत्रणाची यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांनी उभी करण्याची मागणी होत आहे. रेमडेसिविरच्या अनावश्यक वापरामुळे मूत्रपिंडासह विविध अवयवांना साईड इफेक्ट होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे निरीक्षण आहे, तरीही वापर झाला असेल तर त्यावर कोणती कारवाई होणार, अशीही विचारणा रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

चौकट

काही वेदनादायी निरीक्षणे

- मिरज आणि सांगलीतील दोन खासगी रुग्णालयांत रेमडेसिविर चोरुन नेताना कर्मचारी सापडले

- बिलामध्ये रेमडेसिविरची आकारणी, प्रत्यक्षात टोचले नसल्याचे रुग्णांचे दावे

- रुग्ण दाखल केल्यावर दहा दिवसांनंतरही रेमडेसिविर दिल्याच्या तक्रारी

- रेमडेसिविर प्रत्यक्ष टोचल्याच्या खातरजमेची यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे नाही

चौकट

रुग्णांच्या नातेवाइकांचे काही प्रश्न

- मिरज कोविड रुग्णालयात रेमडेसिविरशिवाय रुग्ण बरे होत असतील तर खासगीमध्ये का नाही ?

- जिल्ह्याची दररोजची गरज ७०० इंजेक्शनची असल्याचा अन्न व अैाषध प्रशासनाचा दावा, उपलब्धता मात्र जेमतेम १०० इंजेक्शनची. या स्थितीत रुग्णांसाठी कोणत्या चोरवाटेने इंजेक्शन्स उपलब्ध होतात ?

- रेमडेसिविरचा वापर सर्रास करू नका असे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांचे आवाहन, तरीही सरसकट चिठ्ठ्या देणाऱ्या रुग्णालयांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का?

Web Title: Collector, audit the use of Remedesivir once and for all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.