श्रवणबेळगोळमध्ये रंगांची उधळण; महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:13 PM2018-09-15T23:13:57+5:302018-09-15T23:14:44+5:30
जगाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालू राहिलेला हा पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव ठरला
सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे १६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाचा समारोप सोहळा शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी पार पडला. जगाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालू राहिलेला हा पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव ठरला आहे. स्वतिश्री भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती महास्वामीजींच्या हस्ते रंगांची मुक्त उधळण करत महोत्सवाची सांगता झाली.
माहिती महामस्तकाभिषेक सोहळा कमिटीचे राष्टÑीय सचिव, माजी महापौर सुरेश पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार बैठकीत याबद्दल माहिती दिली.
राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते १६ फेब्रुवारीला या सोहळ्याचा प्रारंभ झाला होता, तर शुक्रवारी १४ सप्टेंबरला भक्तिभावाने अंतिम कलशाभिषेकाने महामस्तकाभिषेक झाला. आचार्य वर्धमानसागर यावेळी उपस्थित होते. महामस्तकाभिषेक सोहळा राष्टÑीय कमिटीच्या अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई) यांना अंतिम महामस्तकाभिषेकाचा मान मिळाला. त्यानंतर सतीश जैन यांना चंदन, केशर, दुग्धाभिषेकाचा मान मिळाला, तर विनोद बाकलीवाल यांना कल्कचूर्ण कलश, विनोद दोड्डनावर यांना सर्वोशधीकलश, सुरेश पाटील
यांना अष्टगंधकलश, कमल जैन यांना हळदकलश, अशोक सेठी यांना केशरी कलश, राकेश सेठी यांना शांतिधाराकलशाचा मान मिळाला.
राष्टÑपती, पंतप्रधान, उपराष्टÑपती, गृहमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती. गेल्या सात महिन्यांत संस्कृत साहित्य संमेलन, विद्वत संमेलन, महिला संमेलनासह इतर विविध धार्मिक उपक्रम यावेळी पार पडले.
दहा दिवसांच्या महामस्तकाभिषेकावेळी १ कोटींहून अधिक भविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता. दररोज ५ लाख लोकांचा अल्पोपहार व दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण देशभरातून १२०० टन शिधा संकलित झाला होता, अशी माहिती पाटील यांनी दिली. आता पुढील महामस्तकाभिषेक सोहळा २०३० मध्ये होणार आहे.