राज्याच्या सत्ताकारणाने बदलले सांगली जिल्ह्याचे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:54 AM2019-11-27T00:54:07+5:302019-11-27T00:54:18+5:30
सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर ...
सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर अस्वस्थता पसरली, तर अस्वस्थ असलेल्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या गोटात आनंदोत्सवाला उधाण आले. दुसरीकडे मंत्रिपदाच्या शर्यतीतही अनेक चेहरे चर्चेत आल्याने जिल्ह्याचे लक्ष आता नव्या सरकार स्थापनेकडे लागले आहे.
तीन दिवसांपूर्वी भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जल्लोष केला होता. गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. पण मंगळवारी सत्तेवरून भाजपला पायउतार व्हावे लागल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय रंग बदलले. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्येची लाट पसरली. भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले. त्यामुळे भाजपचे आमदार व प्रमुख पदाधिकारी मंगळवारी रात्रीच सांगलीला परतले. गेली पाच वर्षे सत्तास्थानी असलेल्या येथील आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांनाही राज्यातील घडामोडींनी अस्वस्थ केल्याचे दिसत होते.
दुसरीकडे राष्टÑवादी, कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील या तिन्ही पक्षांच्या कार्यालयातील वर्दळ वाढली असून, आनंदोत्सवाला उधाण आले आहे.
अचानक काही तासातच जिल्ह्याचे राजकीय रंग बदलले. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तसेच विविध संस्थांमधील समीकरणेही बदलणार आहेत. जिल्ह्यात गेली पाच वर्षे युती म्हणून कार्यरत असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये आता उघड संघर्ष होणार आहे. राज्यात सत्ताबदल होत असताना जिल्ह्यातील बदलणाºया समीकरणांनी सध्या वातावरण ढवळून निघाले आहे.
जिल्ह्याचे वजन : वाढणार
कित्येक वर्षे राज्याच्या राजकारणाचे जिल्ह्याने नेतृत्व केले. महत्त्वाची मंत्रिपदे जिल्ह्याच्या वाट्याला आली होती. कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या येथील नेत्यांना नेहमीच सत्तेत मोठा वाटा मिळत राहिला होता. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात जिल्ह्याला मंत्रिपदासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. सुरुवातीला सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून कृषी राज्यमंत्रिपद आणि नंतर निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरेश खाडे यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळाले होते. आता नव्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाची खाते जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा केंद्रस्थानी
राज्याच्या सत्ताकारणात राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा केंद्रस्थानी राहिला. आता उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही जयंत पाटील असल्याने त्यानिमित्तानेही नव्या सरकारमध्ये सांगली जिल्हा महत्त्वाच्या स्थानी राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी व कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
महामंडळही जाणार
जिल्ह्यात खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पदरी निराशा येणार आहे. विविध महामंडळांवर येथील नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्याही रद्द होणार असून, त्याजागी जिल्ह्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
दोन्ही भावी उपमुख्यमंत्री जिल्ह्याशी संबंधित
राज्यातील नव्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. हे दोन्ही नेते जिल्ह्याशी व विशेषत: वाळवा तालुक्याशी संबंधित आहेत. जयंत पाटील यांचा मतदारसंघ इस्लामपूर आहे, तर बाळासाहेब थोरात हे तालुक्यातील तांबवे या गावचे जावई आहेत. राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक नेताजी पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे जिल्ह्याला व वाळव्याला दोन उपमुख्यमंत्रीपदे मिळाल्याचा आनंद येथील राष्टÑवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.