ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजार समितीची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:20+5:302020-12-24T04:24:20+5:30
फोटो : आमदार सुमनताई पाटील, खासदार संजयकाका पाटील दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू ...
फोटो : आमदार सुमनताई पाटील, खासदार संजयकाका पाटील
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानिमित्ताने वातावरण ढवळून निघत असतानाच, या निवडणुकीकडे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल २७ ऑगस्टला पूर्ण झाला आहे. मात्र कोरोनो महामारीमुळे राज्य शासनाकडून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. विद्यमान संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पाच वर्षापूर्वी झालेली निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात आमदार सुमनताईंच्या नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक बाजार समितीची होत होती. भाजप आणि राष्ट्रवादीकडून सर्वस्व पणाला लावण्यात आले होते. मतदानादिवशी झालेल्या हाणामारीमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेत आली होती. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली.
सत्तेत आल्यानंतर बाजार समितीतील राष्ट्रवादीचा कारभार सुुंदोपसुंदीचा आणि वादग्रस्त राहिला आहे. या कारभाराची सातत्याने चर्चा होत असतानाच, आता निवडणूक चर्चेत आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघत आहे. तालुक्यातील ३९ गावांतील निवडणूक होत असली तरी, गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचे वेध लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी ग्रामपंचायतीच्या रिंगणात उतरून बाजार समितीचा मार्ग सुकर करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
चौकट :
बाजार समितीच्या बिनविरोधची चर्चा
गतवेळची बाजार समितीची निवडणूक खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र पाच वर्षांत दोन्ही नेत्यांतील बदललेली समीकरणे आणि ‘अंडरस्टॅन्डिंग’च्या चर्चेमुळे यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांकडून बिनविरोधचेच प्रयत्न राहणार असल्याची चर्चा आहे.