विश्वजित-संग्रामसिंहांच्या लढतीत अरुण लाड गटाची रंगतदार फोडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:55 AM2019-09-07T05:55:49+5:302019-09-07T05:55:56+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित बिनविरोध आमदार झाले
श्रीनिवास नागे
सांगली : भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघात काही वेगळ्या घडामोडी झाल्या नाहीत, तर यंदा युवा नेत्यांचा सामना पहायला मिळणार आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांना लढत देण्यासाठी भाजपने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नाव सहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले आहे. त्यातच येथील अरुण लाड यांच्या तिसऱ्या गटानेही उचल खाल्ल्याने रंगत वाढली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित बिनविरोध आमदार झाले. त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुराही सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या देशमुख गटाला भाजपने बळ दिले आहे. पृथ्वीराज देशमुख यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद आणि विधानपरिषदेची आमदारकी, तर त्यांचे चुलतबंधू संग्रामसिंह यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्धतशीर देशमुख गटाला रसद पुरवली आहे. युतीतील जागावाटपात हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. विश्वजित यांच्याविरोधात तरुण चेहरा म्हणून संग्रामसिंह यांना पुढे आणण्यात आले आहे.
विश्वजित कदम यांनी नेटाने वाढवलेला संपर्क, पुराच्या काळात केलेले उल्लेखनीय मदतकार्य, मजबूत संस्थात्मक बांधणी, कर्मचाऱ्यांचे जाळे, विकासकामे एकीकडे, तर देशमुख गटाने शासनाकडून आणलेला निधी आणि भाजपचे बळ दुसरीकडे, असा हा सामना आहे. त्यातच येथील क्रांती उद्योग समूहाच्या अरुण लाड गटानेही उचल खाल्ली आहे. ते राष्टÑवादीत असून, त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य शरद यांना शिवसेनेची ‘आॅफर’ आहे. आतापर्यंत त्यांची मदत देशमुख गटाला होत होती. आता ते देशमुख गटाने पैरा फेडावा, या प्रतीक्षेत आहेत.
पाच वर्षात काय घडले?
च्जिल्हा परिषदेत सत्तांतर. सत्ता भाजपकडे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील ८ पैकी ६ जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपकडे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कदम गटाचे विरोधक संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे.
च्पलूस आणि कडेगाव नगरपंचायतींसह बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.
च्सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचा विजय.
च्पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम विधानसभेवर बिनविरोध.
च्देशमुख गटाच्या तुलनेत कदम गटाकडील सर्व सहकारी संस्था उत्तम स्थितीत कार्यरत.
निवडणूक २०१४
पतंगराव कदम (काँग्रेस)
१,१२,५२३ मते
पृथ्वीराज देशमुख (भाजप)
८८,४८९ मते
पोटनिवडणूक २०१८
विश्वजित कदम (काँग्रेस)
बिनविरोध
संभाव्य प्रतिस्पर्धी
विश्वजित कदम (काँग्रेस)
संग्रामसिंह देशमुख (भाजप)
अरुण लाड (राष्टÑवादी)
शरद लाड (राष्टÑवादी/शिवसेना)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या विचारानुसार आणि आ. मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी झटत आहे. भाजपने खुली ‘आॅफर’ दिली असली, तरी काँग्रेस कधीच सोडणार नाही. कारण काँग्रेस आमच्या रक्तात आहे.
- विश्वजित कदम, आमदार