काँग्रेसतर्फे सांगलीत पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, जोरदार निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 01:52 PM2017-12-27T13:52:41+5:302017-12-27T13:53:02+5:30
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
सांगली- माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आलं. ‘मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारतीयांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तान सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीवर अनेक प्रकारची बंधनं पाकिस्तान सरकारने घातली होती. त्यातच पुन्हा प्रत्यक्ष भेटीवेळी त्यांच्या पत्नीस मंगळसूत्र, बांगड्या काढण्यास सांगितलं. इतक्यावरच हे दुष्कृत्य थांबले नाही, तर त्यांनी मराठी भाषेत संवाद साधण्यासही मज्जाव केला. आईला इंग्रजीतून संवाद करा असे सांगून जणू त्यांचा संवाद होऊच दिला नाही. अशा नापाक, बेशरम पाकिस्तान सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. सर्वच भारतीयांमध्ये याविषयी प्रचंड संताप आहे. सर्वच भारतीयांचा अपमान पाकिस्तानने केला आहे.
एकाबाजुला जाधवांच्या आर्इंनी अत्यंत नम्रपणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हात जोडून अभिवादन केले. त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले, पण निर्दयी पाकिस्तानला ही संस्कृती दिसणार कशी? या भेटीत त्या मातेला आपल्या मुलाला कडकडून मिठीसुद्धा मारता आली नाही, ना आपल्या भावना व्यक्त करता आल्या. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य पाकिस्ताने केले आहे. भारत सरकारने याची गांभिर्याने दखल घेऊन त्यांना धडा शिकवावा, असे ते म्हणाले.