चला, कोरोनाला हरवूया, पुन्हा शाळेत जाऊया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:48+5:302021-03-06T04:25:48+5:30

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना ...

Come on, let's beat Corona, let's go to school again! | चला, कोरोनाला हरवूया, पुन्हा शाळेत जाऊया !

चला, कोरोनाला हरवूया, पुन्हा शाळेत जाऊया !

Next

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.

शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्यासाठी १० मार्चपर्यंत मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रादुर्भावाने राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. परिणामी या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाशी नियमित प्रवाह तुटला. या मोहिमेतून त्यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव, शहरे, गजबजलेल्या वस्त्या, बस व रेल्वे स्थानके, बाजार, गुऱ्हाळगरे, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, साखर कारखाने, स्थलातरित कुटुंबे, पदपथ व सिग्नल, गावकुसाबाहेर राहणारे भटके यांच्या वस्त्या धुंडाळल्या जाणार आहेत.

या मोहिमेत कोरोनाचा अडसर मोठा ठरला आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून मुले शाळेतच आलेली नाहीत, त्यामुळे ती थेट शालाबाह्य ठरली आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने कुटुंबे कोरोनाकाळात गावाकडे स्थलांतरित झाली. त्यांची मुलेही शालाबाह्य ठरली आहेत. त्यांना शाळेच्या संपर्कात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्याने ती ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली, तीदेखील शालाबाह्य ठरली आहेत. आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने त्यांना प्रवाहात आणावे लागणार आहे. ग्रामीण भागात आठवी-नववीनंतर अनेक मुलांनी कोरोना काळात शाळेला कायमची सोडचिठ्ठी दिल्याचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.

कोरोनामुळे बैठका झाल्याच नाहीत

मार्चमध्ये सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी बैठका होणे अपेक्षित होते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा, तालुका व गावस्तरावर या बैठका होतात; पण यंदा कोरोनामुळे त्यावर मर्यादा आल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखून बैठकांचे आयोजन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; पण गावस्तरावर व्यापक बैठका शक्य झाल्या नाहीत. तरीही घरोघरी संपर्काचे नियोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून अंगणवाडी सेविकांपर्यंत प्रत्येकाचा यामध्ये सहभाग घेण्यात आला.

चौकट

ग्रामसेवकांना सूचनाच नाहीत

या मोहिमेत ग्रामसेवकांचा सहभाग अपेक्षित आहे. गावपातळीवर स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार यांच्या नोंदी ठेवून त्या पथकाला देण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर असेल; पण जिल्ह्यात अद्याप त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. तशा कोणत्याही सूचना नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. १० मार्चला मोहीम संपणार असल्याने आता ग्रामसेवकांच्या सहभागाची शक्यताही नाही असेही सांगण्यात आले.

चौकट

आम्ही गावकुसाबाहेरचेच !

१. गावोगावी सर्वेक्षण सुरू असले तरी शंभर टक्के स्थलांतरितांपर्यंत पथके अद्याप पोहोचलेली नाहीत. म्हैसाळ प्रकल्पाच्या शाखा कालव्यांच्या अस्तरीकरण कामी अनेक मजूर जिल्हाभरात आले आहेत. त्यांची मुले अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे.

२. जिल्ह्यात हजारो ऊसतोड कामगार गावोगावी पाल ठोकून राहत आहेत. काही कारखान्यांचे गाळप संपत आल्याने तेथील कामगार गावाकडे परतू लागले आहेत. अशी प्रवासातील कुटुंबेदेखील सर्वेक्षणात आलेली नाहीत. अद्याप मागे राहिलेल्या कुटुंबांशी १० मार्चपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असेल.

पाॅईंटर्स

- शालाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्हाभरात नेमलेली पथके - ६६०

- एकूण कर्मचारी संख्या - ७०००

- तालुकानिहाय पथके

मिरज ११०, वाळवा ६०, जत ९०, आटपाडी ६०, तासगाव ५०, शिराळा ४०, कवठेमहांकाळ ५०, कडेगाव ५०, खानापूर ७०, पलूस ४०

कोट

१ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाभरात शालाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली जात आहे. विशेषत: कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्यांचीही नोंद घेतली जात आहे. मोठ्या शहरांतून अनेक कुटुंबे लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतली, त्यांच्या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी.

Web Title: Come on, let's beat Corona, let's go to school again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.