शाहू-आंबेडकर परंपरेसाठी एकत्र या

By admin | Published: September 4, 2016 12:00 AM2016-09-04T00:00:56+5:302016-09-04T00:31:42+5:30

रामदास आठवले : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची प्रशंसा

Come together for the Shahu-Ambedkar tradition | शाहू-आंबेडकर परंपरेसाठी एकत्र या

शाहू-आंबेडकर परंपरेसाठी एकत्र या

Next

मिरज : राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य दिले होते. छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकरांची परंपरा चालविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी व्यक्त केले.
इनाम धामणी (ता. मिरज) येथील विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकतर्फे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शंभर मुला-मुलींना दत्तक घेऊन त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण व नोकरी देण्याच्या उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची पाहणी करताना आठवले बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. आठवले यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
ते म्हणाले की, दलित व मराठ्यांचे ऐक्य झाले पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आमच्या पक्षाला सर्व जाती-धर्मांचा आधार आहे.
हरिभाऊ बागडे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही काही तालुक्यांत दुष्काळ आहे, मात्र तेथे शेतकरी शंभर टक्के शेतीवर अवलंबून न राहता, त्यांच्या घरातील एकजण नोकरी करीत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात गरिबी व दैन्य दूर करण्यासाठी दर्जेदार शिक्षणाला पर्याय नाही. वशिल्यावर आता नोकऱ्या मिळणार नाहीत. शिक्षणासाठी निधी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र चांगले शिक्षण देणाऱ्या संस्था मोजक्या आहेत.
राजकुमार बडोले म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे विठ्ठल पाटील यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा व वेदना समजून मराठवाड्याला आपुलकीचा हात देण्याचे काम केले आहे.
मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मदत करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुले नैराश्येपोटी गुन्हेगारी व व्यसनांकडे वळू नयेत, यासाठी त्यांना शिक्षण व नोकरी देण्यात येणार आहे. समाजातील अन्य संस्थांनीही शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
सौ. मालुश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्तक योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बागडे व बडोले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, बापूसाहेब पुजारी, मकरंद देशपांडे, प्राचार्य बी. बी. लवटे उपस्थित होते. (वार्ताहर)

असाही आशीर्वाद..
कार्यक्रमात आठवले म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री असताना प्रत्येकवेळी मला मंत्रीपदाची संधी मिळाली. मात्र नंतर पंढरपूरऐवजी त्यांनी मला शिर्डीला साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवले. मात्र तेथील आशीर्वाद ‘असा’ असेल असे वाटले नव्हते, असा टोला मारत, ‘मंत्री होण्यास सर्वांनी केली होती बंदी, मात्र मोदींनी दिली मला संधी’, अशी चारोळी रामदास आठवले यांनी करताच हशा उसळला.

Web Title: Come together for the Shahu-Ambedkar tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.