गॅसबत्त्यांच्या उचापतींनी आयुक्त संतापले
By admin | Published: December 10, 2014 11:03 PM2014-12-10T23:03:52+5:302014-12-10T23:44:33+5:30
लेखी आदेश : महापालिकेतील माहिती कोणालाही न देण्याच्या सूचना; विभाग प्रमुखांना खडसावले
सांगली : महापालिकेत नगरसेविकेचा पती व मुले यांना गॅसबत्त्या आणि मेणबत्त्या अशा नावाने ओळखले जाते. सध्या महिला सदस्यांच्या अशा नातलगांनी सुरू केलेल्या उचापतींनी महापालिका आयुक्त चांगलेच संतापले आहेत. त्यांनी यासंदर्भात आज खातेप्रमुखांना लेखी आदेश काढले. सदस्यांच्या नातलगांची प्रशासकीय कामातील ढवळाढवळ थांबवावी, अशी सूचना प्रत्येक विभागप्रमुखांना देण्यात आली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून महिला सदस्यांच्या नातलगांची ढवळाढवळ सुरू आहे. ही परंपरा आजही कायम आहे. महिला सदस्याचा पती, त्यांची मुले यांची लुडबूड सध्या वाढली आहे. याची गंभीर दखल आयुक्त अजिज कारचे यांनी घेतली. महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांना त्यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढले. यात त्यांनी म्हटले आहे की, महिला नगरसेवकांचे नातेवाईक असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा प्रशासकीय कामातील हस्तक्षेप खपवून घेण्यात येऊ नये. अशा लोकांकडून अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करणे असे प्रकार वाढले आहेत. अशा लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये.
सदस्यांनी एखादी माहिती मागविली असेल, तर त्यांना माहिती द्यायला हवी, मात्र सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस माहिती पुरविण्यात येऊ नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.
ठेकेदारांनाही काम करताना अडथळे निर्माण करण्याचे प्रकार अशा उचापतखोर गॅसबत्त्या करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. टक्केवारीतून या सर्व गोष्टी होताना दिसत आहेत. त्यामुळेच महिला सदस्यांच्या नातलगांचा मुद्दा आता प्रशासकीय स्तरावर कळीचा बनला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आयुक्ताने अशाप्रकारचे आदेश काढले आहेत. यापूर्वी वारंवार अशा उचापतखोर नातलगांची चर्चा झाली, तक्रारीही झाल्या. पण प्रत्यक्षात त्याविषयी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच आता आयुक्तांनी याबाबतचे लेखी आदेश दिल्याने विभागप्रमुखांनाही बळ मिळाले आहे.
महिला सदस्याऐवजी खरा कारभार सदस्येचा पतीच करीत असल्याचे आता दिसत आहे. महापालिकेत महिला सदस्यांऐवजी अशा उचापतखोर पतींचा आणि त्यांच्या मुलांचाच वावर अधिक दिसतो. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, अँटी चेंबरमध्ये अशा उचापतखोरांचीच गर्दी अधिक असते. (प्रतिनिधी)
बारसे असे झाले...
गटनेते किशोर जामदार यांनी महापौर असताना अशा उचापतखोरांचे बारसे केले. पूर्वी वरातीमध्ये सगळ्यात पुढे गॅसबत्त्या असायच्या. म्हणून या महिला सदस्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या त्यांच्या पतींना त्यांनी गॅसबत्त्या व त्यांच्या मुलांना मेणबत्त्या असे नाव दिले. तेव्हापासून आजअखेर त्यांना त्याच नावावे बोलावण्यात येते.
महापालिकेच्या सभागृहातही गेल्या अनेक वर्षांपासून गॅसबत्त्या, मेणबत्त्या परवानगी नसताना बसत आहेत. सदस्यांना तिथूनच कोणते मुद्दे मांडायचे, याबाबतच्या सूचना ते करीत असतात. सभागृहातील मागील बाजूस अशा गॅसबत्त्यांची मोठी गर्दी असते. आयुक्तांकडून याबाबतही लेखी आदेश निघणार का, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.