कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 08:04 PM2019-08-16T20:04:11+5:302019-08-16T20:06:23+5:30
मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे ...
मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. यापुढे महापुरापासून बचावासाठी पूरग्रस्त गावात बोटी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.
महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या १७ जणांच्या मृत्यूस प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंत्री खाडे यांना विचारणा केल्यानंतर, या दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्लारी येथील भूकंपानंतर झालेल्या मदतकार्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी चांगल्या प्रकारे मदतकार्य केले.
पुराचे पाणी शिरल्यानंतर सर्वच ठिकाणी प्रशासनाने तातडीने बोटी उपलब्ध करून दिल्या. पुराची पातळी वाढत असताना पूरग्रस्त गावांतील अनेक ग्रामस्थांनी सुरुवातीस स्थलांतरास नकार दिला. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मात्र सर्वांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली. ब्रम्हनाळ येथे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त ग्रामस्थ बसल्याने दुर्घटना घडली. या दुर्घटनेची शासकीय पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे.
पूरग्रस्त गावांना शासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० किलोमीटर रस्ते बाधित झाले असून या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने विनानिविदा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या दलित कुुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी दलित कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सुरेश खाडे यांनी सांगितले.
अलमट्टी धरण जबाबदार नाही
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही. कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्यांना एकाचवेळी पूर आल्याने पाणी पुढे वाहून न जाता पात्राबाहेर पडले. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या योजनेचाही फेरआढावा घेण्यात येईल. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.