सांगलीतील वाहतूक कोंडीसाठी तज्ज्ञांची समिती; आयुक्त, पोलिस, नगरसेवक, नागरिकांची बैठक
By शीतल पाटील | Published: July 11, 2023 07:53 PM2023-07-11T19:53:48+5:302023-07-11T19:54:00+5:30
सांगली शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्याबाबत महापालिकेत बैठक झाली.
सांगली: शहरातील प्रमुख बाजारपेठेसह मुख्य चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करून ठोस आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी मंगळवारी दिली. तत्पूर्वी पुढील आठ दिवसात शहरातील पार्किंग ठिकाणे विकसित करण्यासह दिशादर्शक फलकाची उभारणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्याबाबत महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त राहुल रोकडे, पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव उपस्थित होते. प्रारंभी वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, शहर निरीक्षक अभिजित देशमुख यांनी वाहतूक नियोजनाबाबत सूचना मांडल्या. ठिकठिकाणी पार्किंग पट्टे मारून द्यावेत, पार्किंगची ठिकाणे महापालिकेने विकसित करावेत, अशी मागणी केली.
यावेळी नगरसेवक सुबराव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक गौतम पवार, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेचे शंभोराज काटकर, सराफ असोएशनचे रणजित जोग, बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर आदींनी मते मांडली. शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याची सूचना गौतम पवार यांनी मांडली. आर्यविन पुलाला समांतर पुल कार्यान्वित झाल्यानंतर अवजड वाहतूकीला तेथूनही बंदी घालावी. अवजड वाहतूकीसाठी रिंग रोडचा वापर करण्याची सक्ती हवी, अशी सूचना शंभोराज काटकर यांनी मांडली.
आयुक्त पवार यांनी शहरातील पार्किंग ठिकाणे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. वाहतूक शाखेच्या समवेत पार्किंग पट्टे, दिशादर्शक फलकही उभारले जातील, असे सांगितले. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आभार केले.
बैठकीतील निर्णय
० शहरातील पार्किंग ठिकाणे विकसीत करणार
० पार्किंगबाबत दिशादर्शक फलक उभारणार
० प्रमुख बाजारपेठेतील मार्गावर पंढरे पट्टे मारले जाणार
० वाहतूक शाखेच्या मदतीला महापालिका वॉर्डन देणार
० शनिवारी हरभट रोडवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्याना हटविणार
० खासगी बसेस उभारणीसाठी स्वतंत्र झोन
० शहरात काही ठिकाणी नो पार्किंग झोन
० फेरीवाले धोरणाची तातडीने अंमलबजावणी