Commonwealth Games 2022: रौप्य पदक विजेत्या संकेतचे वडील म्हणाले, "आम्हाला सुवर्णपदकाचाच विश्वास होता; पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:48 PM2022-07-30T18:48:03+5:302022-07-30T18:56:56+5:30
संकेत सोने लुटूनच परतणार, असा विश्वास होता; पण
संतोष भिसे
सांगली : कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पानटपरी आणि चहाचा गाडा चालविणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगर या २१ वर्षीय तरुणाने राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. भारोत्तोलनात (वेटलिफ्टिंग) भारताला पहिले पदक मिळवून दिले. टपरीवर पान आणि चहा विकणाऱ्या संकेतने ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. हात दुखावलेला असतानाही त्याने भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यशस्वीरीत्या उचलले.
संकेतच्या यशानंतर सांगलीत जल्लोष झाला. तो राहत असलेल्या संजयनगरमध्ये आणि प्रशिक्षण घेत असलेल्या दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिठाई वाटण्यात आली. इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील वेटलिफ्टिंग स्पर्धेचे थेट प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रातील मोठ्या पडद्यावर करण्यात आले. संकेतचा पराक्रम पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय व सहकारी सकाळपासूनच तेथे थांबून होते. संकेतने रौप्यपदक मिळवताच एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी संकेतचे वडील महादेव सरगर यांनी तो गेल्या काही वर्षांपासून घेत असलेल्या अथक परिश्रमांचे सार्थक झाले. त्याची तयारी पाहून आम्हाला सुवर्णपदकाचाच आत्मविश्वास होता; पण दुखण्याने डोके वर काढल्याने पदक हुकले अशी प्रतिकिया दिली.
सांगलीचा दुसरा खेळाडू
संकेत राष्ट्रकुलमध्ये खेळणारा सांगलीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. ५२ वर्षांपूर्वी हिंदकेसरी मारुती माने यांनी इंडोनेशियामधील राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीचे मैदान गाजविले होते. संकेतचे मूळ गाव सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जुनोनी. वडील चरितार्थासाठी सांगलीत आले. त्यांचा चहा-नाष्ट्याचा गाडा आहे. संकेतने आष्ट्याच्या महाविद्यालयातून बीए केले आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यानेही चार वर्षांपूर्वी बसस्थानकाजवळ पानटपरी आणि संजयनगरात चहाचा गाडा सुरू केला. त्यातून वेळ काढून तो वेटलिफ्टिंगचा सराव करतो.
सरावादरम्यान दुखापत
तीन महिन्यांपूर्वी सरावादरम्यान त्याचा उजव्या हाताचा कोपरा दुखावला होता. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या फिजिओथेरेपिस्टने कुटुंबीयांना दिली होती. त्यामुळे संकेत सोने लुटूनच परतणार, असा विश्वास होता; पण ‘क्लिन अँड जर्क’च्या दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या दुखण्याने पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे त्याला सुवर्ण पदकापासून दूर राहावे लागले.
तेराव्या वर्षापासून वेटलिफ्टिंग
संकेतने २०१३-१४ पासून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवायला सुरुवात केली होती. तो २०१८ पासून राज्य स्पर्धांत सहभाग घेऊ लागला. लॉकडाऊनमध्ये तर सरावाचे सारे साहित्य घरातच आणले होते. सध्या मयूर सिंहासने यांच्याकडे तो प्रशिक्षण घेत आहे.
बहीण-भाऊ ‘एकसे बढकर एक’
संकेतची धाकटी बहीण काजलने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. तिच्या पराक्रमाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. ‘मन की बात’मध्ये तिचा गौरव केला होता