संचारबंदीने नागरिकांना आणले ‘आॅनलाईन’वर : इंटरनेट बनला सेतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:01 AM2020-04-01T00:01:10+5:302020-04-01T00:02:49+5:30
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत.
सांगली : कोरोनामुळे सुरू झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने आता नागरिकांना बहुतांश व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. घरपोहोच भाजीपाला, साहित्य पुरवठा सेवा, औषधे, तक्रारी, माहिती, बँकिंगचे व्यवहार, गॅसचे बुकिंग अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा आॅनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत. अशावेळी घरात बसूनच सर्व गोष्टींची तजवीज कशी करायची, असा प्रश्न संचारबंदीच्या सुरुवातीच्या दिवसात नागरिकांना सतावत होता. आता आॅनलाईन व्यवहारांनीच त्यासाठीचा मार्ग शोधून दिला आहे. घरपोहोच सेवा सुरू झाल्यानंतर त्यांची मागणी आॅनलाईन म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून नोंदविली जाते. त्यानंतर घरपोहोच सेवा पुरविण्यात येत आहे.
भाजीपाला, किराणा माल, औषधे अशा अत्यावश्यक गोष्टींकरिता आॅनलाईन व घरपोहोच सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे याचा लाभ आता नागरिक घेत आहेत. बँकिंगचे व्यवहारही आॅनलाईन केले जात आहेत. पैसे काढणे, दुसऱ्याच्या खात्यावर टाकणे, खात्याचे स्टेटमेंट काढणे, आॅनलाईन अपडेशन अशा अनेक गोष्टी करता येत आहेत.
कार्यालयीन कामांसाठी वापर
कार्यालयीन कामे घरातून करून देण्याची पद्धतही संचारबंदीने सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांची कामे आता घरात बसून आॅनलाईन पद्धतीने केली जात आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. मेल, व्हॉटस् अॅप व अन्य सॉफ्टवेअर, अॅप्लिकेशनचा वापर यासाठी सुरू झाला आहे.
संगीत शिक्षण आॅनलाईन
काही खासगी क्लासेस, संगीत विद्यालयांकडून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. सांगलीतही गुरुकुल संगीत विद्यालयाने आॅनलाईन पद्धतीचा वापर करून प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंगद्वारे संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. गुरुकुलच्या संस्थापक मंजुषा पाटील स्वत: राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संपर्क करून गुरुकुल पद्धतीने संगीताचे धडे देत आहेत.
यापूर्वी या गोष्टींबाबत फारसे उत्सुक नसलेले लोकही आता आॅनलाईनचा पर्याय स्वीकारत आहेत.
सततच्या वापरामुळे आॅनलाईन व्यवहाराबद्दल लोकांचे ज्ञानही वाढले आहे.
जुन्या पिढीतल्या लोकांनाही या व्यवहारांची माहिती करून दिली जात आहे.
आॅनलाईन वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाढत्या वापरामुळे इंटरनेटवरील ताणही वाढत आहे.
आॅनलाईन रक्तचाचणी सेवेचा वापर वाढला
शहरातील काही रक्त तपासणी प्रयोगशाळांमार्फत आत्यावश्यक बाब म्हणून घरी येऊन रक्त तपासणी करणे व त्याचा अहवाल पाठवून देण्याची सेवा बजावत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार अशा रक्त चाचण्यांसाठी आॅनलाईन व्यवहार केले जात आहेत.