सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या तक्रारी करा थेट 'एसपीं'च्या मोबाइलवर, बसवराज तेली देणार स्वत:चा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 04:47 PM2023-08-12T16:47:12+5:302023-08-12T16:49:19+5:30
शहरातील सर्व स्पा सेंटरची तपासणी
सांगली : शहरासह जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू राहू नयेत यासाठी कारवाईच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून गैरप्रकारांवर कारवाई सुरू असून, यात नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती मिळावी यासाठी मी स्वत: एक मोबाइल क्रमांक देणार असून, नागरिकांनी निर्भयपणे त्यावर तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत केले.
अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह इतर पोलिस ठाण्यात खास पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच मी एक मोबाइल क्रमांक जनतेसाठी खुला करणार असून, त्याचे स्वत: नियंत्रण ठेवणार आहे. यावर मेसेज अथवा व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून जनतेला तक्रारी करता येतील. माझ्याकडे आलेल्या तक्रारींची तातडीने दखलही घेतली जाईल.
जिल्ह्यात अमलीपदार्थांची विक्री आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे उत्पादन होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात सध्या शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यातील फसवणुकीच्या रकमाही मोठ्या असल्याने प्रकरणाची तातडीने दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही अशा फसव्या योजनांमध्ये अडकू नये.
जिल्ह्यासह शहरातील मुली, महिलांच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाचे काम गतीने सुरू करण्यात आले असून, यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सहा पथके कार्यरत असून, पोलिस काका व पोलिसदीदी उपक्रमातूनही प्रत्येक शाळा, महाविद्यालयापर्यंत पोलिस पाेहोचून मदत करतील, असे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील सर्व स्पा सेंटरची तपासणी
शहरात स्पा सेंटर व मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत यासाठी शहरातील सर्व स्पा सेंटर, मसाज पार्लरची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही अधीक्षक डॉ. तेली यांनी सांगितले.