अनागोंदी कारभार; शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु, परीक्षा संचालकांविरुद्ध तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:59 AM2024-05-25T11:59:32+5:302024-05-25T11:59:56+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे रिपब्लिकन ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, विविध अभ्यासक्रम (ऑक्टोबर २०२३ परीक्षा) पेपर तपासणी, फेरतपासणी पुनर्मूल्यांकनमधील भोंगळ कारभार, कॅरी ऑनची विशेष संधी चालू सत्रासाठी/चालू शैक्षणिक वर्षासाठी (विधि अभ्यासक्रम) लागू करावी. फेरतपासणीमध्ये गुण वाढले तर लाभ त्या विद्यार्थ्यांना दिला जातो, मात्र कमी झाले तर विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते, हा अन्याय आहे. विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले असल्यास फेरतपासणीच्या आधी दिलेले गुण ग्राह्य धरून त्याचा लाभ देण्यात यावा, काही प्रकरणांत एक-दोन गुणांमुळे विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणे, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या गुणांच्या तफावतीबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार करूनही सुनावणी घेतली जात नाही.
कोल्हापूर येथील विधि कॉलेजमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना ऑक्टोबर २०२३ परीक्षेस संधी दिली. पण इतर विधि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. त्यामुळे भारतीय संविधान कलम १४चे उघड उल्लंघन झाले आहे. तसेच फेरतपासणीमध्ये गुणात बदल झाल्यास नियमानुसार फी परत करण्याची तजवीज करण्यात यावी. पेपर तपासणी/फेरतपासणीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते.
शासन निर्णय २०२२ नुसार सीएचबी (तासिका तत्त्वावरील) शिक्षकांना पेपर तपासणी व फेरतपासणी देऊ नये, याबाबत स्पष्ट आदेश असताना अंमलबजावणी केली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयामार्फतच विद्यापीठाला पत्रव्यवहार करावा, असे अजब फर्मान काढण्याचा अधिकार कोणी दिला आहे? विद्यापीठ एकाधिकारशाही कारभार करत आहे, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे.
२९ मेपासून आंदोलनाचा इशारा..
सर्व प्रकरणांबाबत कुलगुरु तसेच संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा दि. २९ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टी युवा अध्यक्ष सुनील क्यातन, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिला आहे.