अधिकाऱ्यासह चौघांविरोधात फसवणुकीची तक्रार- तासगाव पंचायत समितीकडून अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:56 PM2018-08-30T23:56:01+5:302018-08-30T23:56:51+5:30
अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित
तासगाव : अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकºयाने पंचायत समितीतील एका अधिकाºयासह अभिनव क्रांती या संस्थेच्या तिघांविरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केलेला घोटाळा ‘लोकमत’मधून सर्वप्रथम उघडकीस आणण्यात आला होता.
पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाचे तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर, मालगाव (ता. मिरज) येथील सतीश भूपाल सनदी, राजू भूपाल सनदी आणि हेमंत भंडारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत भाऊसाहेब एरंडोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचायत समितीतील तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर यांनी अभिनव क्रांती या संस्थेकडून अनुदानावर ट्रॅक्टर मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये १ लाख ७५ हजार रुपये रोख, तर २ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्वारे, असे एकूण चार लाख २५ हजार रुपये देण्यात आले होते. ही रक्कम दिल्यानंतर ट्रॅक्टर देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि नांदणीकर यांच्याकडे तगादा लावला होता.
मात्र त्यांच्याकडून ट्रॅक्टर मिळाला नाही. त्याऐवजी २५ आॅक्टोबर २०१७ रोजी २ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. खात्यावर पैसे नसल्याने हा धनादेश बँकेत वठला नाही. त्यानंतर १० एप्रिल २०१८ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेशही वठला नाही.
अनुदानावर ट्रॅक्टर देतो असे सांगून पावणेचार लाख रुपये घेतले. त्यानंतरही ट्रॅक्टर दिलाच नाही. त्याऐवजी पैसे परत देण्यासाठी दिलेले धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे खोटे धनादेश देऊन आणि अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वरील चौघांवर कारवाई करावी व पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी एरंडोले यांनी पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.
तासगावात दुसरी तक्रार
अभिनव क्रांती संस्थेच्या पदाधिकाºयांविरोधात यापूर्वीही जत तालुक्यातील काही शेतकºयांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. आता तासगाव तालुक्यातील शेतकºयांकडूनदेखील तक्रार दाखल झाली आहे. एकाच शेतकºयाने तक्रार दिली असली तरी, तालुक्यासह जिल्ह्यात फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे.