होर्डिंग ठेकेदाराविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:37+5:302021-09-24T04:30:37+5:30
फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील विद्युत पोलवर ३ बाय ५ आकाराचे फलक लावण्याचा ठेका लाईट लाॅजिक या कंपनीला देण्यात ...
फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील विद्युत पोलवर ३ बाय ५ आकाराचे फलक लावण्याचा ठेका लाईट लाॅजिक या कंपनीला देण्यात आला होता. या ठेक्याची मुदत ३१ मार्च रोजी संपली. त्यानंतरही ठेकेदाराने शंभर फुटी रोड, राममंदिर ते पुष्पराज चौक येथील विद्युत पोलवर बेकायदेशीररीत्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या फलकामुळे शहराच्या सौदर्यांला हानी पोहोचून मालमत्तेचे विद्रूपीकरण झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ठेकेदारावर मालमत्तेचे विद्रूपीकरण महाराष्ट्र अधिनियम १९९५ कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शहरातील राजवाडा चौक ते पुष्पराज चौक, विश्रामबाग उड्डाण पूल, शंभर फुटी रस्ता, हरभट रोडसह विविध ठिकाणच्या विद्युत पोलवर जाहिरात फलक लावले जात आहेत. त्यासाठी दर वर्षी महापालिकेकडून निविदा मागविल्या जातात. यातून पालिकेला १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय, या पोलची देखभालही होते. पण जाहिरात फलक ठेक्याची मुदत संपून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. कोरोनाचे कारण देत नव्याने निविदा मागविण्यास टाळाटाळ करण्यात आली. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी ठेकेदारावर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मालमत्ता विभागाने ठेकेदाराविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे.