मिरजेत मुदतबाह्य औषधांमुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:13 PM2022-08-19T13:13:43+5:302022-08-19T13:37:00+5:30
डॉक्टरांनी मुदतबाह्य प्रतिजैविके बालकाला दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे बालकास उपचारांसाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले.
मिरज : मिरजेत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुदतबाह्य औषधे दिल्यानंतर पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी शहर पोलिसांत केली आहे.
उझेर जोहेब मुल्ला या पाच वर्षांच्या बालकास दि. २४ जूनला मिरजेतील एका बालरुग्णालयात विषमज्वराच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मुदतबाह्य प्रतिजैविके बालकाला दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे बालकास उपचारांसाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान ५ जुलैला त्याचा मृत्यू झाला. बालरुग्णास मुदतबाह्य औषधे देऊन उपचारांत हलगर्जीपणा केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलाचे वडील जोहेब आझम मुल्ला यांनी पोलिसांत केली आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा वासिम मुल्ला, अरिफ मुल्ला यांनी निवेदनाद्धारे दिला आहे.