इस्लामपूरच्या उर्दू शाळेमध्ये कोटीच्या अपहाराची तक्रार, तिघांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:06 PM2022-12-24T17:06:15+5:302022-12-24T17:06:37+5:30
एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकले
इस्लामपूर : शहरातील इस्लामपूर एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूलच्या विकासासाठी मिळालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याच्या घटनेत मुख्याध्यापकांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली.
मुख्याध्यापिका आबेदा कोतकुंडे, संस्थेचे तथाकथित अध्यक्ष सैफ रफीक मुल्ला व सचिव मिनाज दिवाण अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीने या अपहाराबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी व पोलिसांकडे केली होती; मात्र या दोन्ही विभागांनी हा विषय त्यांच्या अखत्यारीतला आहे, असे सांगत एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकले होते.
त्यामुळे शकील हारुण गोलंदाज यांनी येथील न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. उर्दू हायस्कूलच्या विकासासाठी संस्थेच्या बॅँक खात्यावर निधी होता; मात्र संस्थेच्या संचालक मंडळाचा खटला न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित खात्यावरून व्यवहार करण्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रतिबंध घातले होते; मात्र तरीसुद्धा मुख्याध्यापिका आबेदा कोतकुंडे, अध्यक्ष सैफ मुल्ला आणि सचिव मिनाज दिवाण यांनी हा अपहार केल्याचा आरोप उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीने केला होता.
या दाव्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. जयस्वाल यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी कलम १५६/३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा तपास अहवाल अथवा दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे असे आदेश दिले आहेत.
इस्लामपूर पोलिसांकडे तपास
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध संस्थेच्या संचालक मंडळाचा खटला न्यायप्रविष्ट असताना येथील इस्लामपूर अर्बन बॅँकेमधील खाते पुन्हा कार्यरत करून फेब्रुवारी २० ते डिसेंबर २२ या कालावधीत एक कोटी रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. तपास इस्लामपुर पोलिस करीत आहेत.