वीज बिल घोटाळ्याबाबत प्रधान सचिवाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:07+5:302021-01-16T04:31:07+5:30
सांगली : महापालिकेच्या वीज बिलात प्रथमदर्शनी सव्वा कोटीचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यास महापालिकेसह वीज महावितरण कंपनीही जबाबदार ...
सांगली : महापालिकेच्या वीज बिलात प्रथमदर्शनी सव्वा कोटीचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यास महापालिकेसह वीज महावितरण कंपनीही जबाबदार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने राज्याच्या प्रधानसचिवांकडे करण्यात आली.
समितीचे गौतम पवार यांनी प्रधान सचिवांना याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वीज बिलात एक कोटी २९ लाखांचा गैरव्यवहार झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचा विद्युत व लेखा विभाग, वीज भरणा केंद्राकडील कर्मचारी व महावितरण कंपनीच्या अधिकऱ्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. महापालिकेने दिलेले धनादेश खासगी लोकांच्या नावावर जमा करण्यात आले आहेत. एकीकडे वीज बिलापोटी महापालिकेकडून धनादेश घेण्यात आले तर दुसरीकडे खासगी ग्राहकांकडून रोखीने पैसेही घेतले गेले आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे. वीज बिले प्रमाणित करणारी महावितरण यंत्रणा सहकार्य करत असल्याविना हा अपहार शक्य नसून असाच प्रकार राज्यात अनेक ठिकाणी घडलेला असू शकतो. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होऊन दोन्ही विभागांतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.