सांगलीतील शिवसेना नेते तानाजी पाटलांविरोधात ईडीकडे तक्रार, संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:59 PM2022-12-13T12:59:11+5:302022-12-13T13:00:13+5:30
मच्छिंद्र माळी यांनी चौकशी करण्याची केली मागणी
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा गैर वापर करून एक हजार ७० एकर जमीन संपादित केली आहे. त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्याची मागणी मच्छिंद्र माळी अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे.
मच्छिंद्र माळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तानाजी पाटील व त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावे व मुलाच्या नावे तसेच भाऊ व भावजय यांच्या नावे मालमत्ता संपादित केली आहे. तानाजी पाटील यांनी मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरांमधून स्थावर मालमत्ता घेत त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. पदाचा गैरवापर करून आटपाडी तालुक्यातील दिघंची, करगणी, आटपाडी, पुजारवाडी, शेरेवाडी, मुढेवाडी, विठ्ठलापूर, मापटेमळा, खरसुंडी यासह वासुद (ता. सांगोला) याठिकाणी एकूण १०७० एकर जमीन मिळविली आहे.
तसेच दोन पेट्रोल पंप, विविध बँकांमधून मुदत ठेवीची गुंतवणूक, पुणे व मुंबई येथे सदनिका व मोकळे भूखंड खरेदी केले आहेत. मनी लॉन्ड्री अधिनियमाचे उल्लंघन करून त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी काढून घेतल्या आहेत. त्या संबंधितांनी स्थानिक पोलिसांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. याबाबत चौकशी करण्याची मागणी माळी यांनी ईडीकडे केली आहे.