पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाऊस
By admin | Published: January 23, 2015 12:23 AM2015-01-23T00:23:10+5:302015-01-23T00:38:49+5:30
नागरिकांची गाऱ्हाणी : संबंधित विभागांना म्हणणे मांडण्याचे आदेश
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आज (गुरुवार) नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. सुमारे दोनशेहून अधिक तक्रारी पालकमंत्र्यांकडे सादर करण्यात आल्या. पालकमंत्री पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ दिला होता. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महापालिका आदी विभागांकडे रखडलेल्या कामांची गाऱ्हाणी नागरिकांनी मांडली. पाणी बिलापासून ते रस्ते बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता. अल्पबचत सभागृहात यावेळी नागरिकांची झुंबड उडाली होती. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांंनी दाखल केलेल्या तक्रारी आज संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. याबाबत काय निर्णय झाला, याची माहिती तक्रारदाराला देणे व त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. उर्वरित तक्रारींबाबत स्वत: निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)