भाजप नेत्यांकडून सांगली पोलिस प्रमुखांविरोधात तक्रारी, गृहमंत्र्यांकडून दखल
By अविनाश कोळी | Published: June 7, 2023 12:58 PM2023-06-07T12:58:51+5:302023-06-07T12:59:15+5:30
गुन्हेगारीच्या आलेख वाढल्याबद्दल चिंता.
अविनाश कोळी
सांगली : भरदिवसा सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेसह गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हेगारी घटनांचा दाखला देत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सोमवारी पोलिसप्रमुखांच्या निष्क्रियेतेचा पाढा फडणवीस यांच्यासमोर वाचला होता. भाजप नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतल्याने कारवाईचे संकेत मिळत आहेत.
गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यात खून व दरोड्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लूटमार केली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार, नशेखोरीचे प्रमाणही चिंताजनक आहे. तरुण नशा करून गुन्हे करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिलायन्स ज्वेल्स या सोने-चांदीच्या दुकानात एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. हे शोरूम जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेपिरान, शिराळा तालुक्यातील निगडी येथे दरोडे पडले. सांगलीतील एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. या लोकप्रतिनिधीकडे स्वतःचे शस्त्र असल्याने तो बचावला.
अनेक कॉलेज तरुण-तरुणी कॉलेजमध्ये तसेच आसपासच्या कॅफेमध्ये नशा करत आहेत. सावकारी वाढली आहे. बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या, मात्र मुख्य सूत्रधारास अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हेगारीने कळस गाठला असताना पोलिस अधिकारी शांत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फडणवीस यांच्याकडून कारवाईचे संकेत
तक्रारी प्राप्त होताच फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन गाडगीळ यांना दिले. येत्या काही दिवसांत पोलिस दलात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
यांनीही केल्या तक्रारी
भाजपचे पालकमंत्री खाडे, आ. गाडगीळ यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही जिल्ह्यातील निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांबाबत सरकारकडे तक्रार केली आहे.