मार्चअखेर विकासकामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 10:37 PM2016-03-10T22:37:33+5:302016-03-11T00:02:08+5:30
रश्माक्का होर्तीकर : जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक
सांगली : जिल्ह्यातील विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असून त्याचा वापर होणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष संपण्यास थोडाच कालावधी शिल्लक असल्याने, खाते प्रमुखांनी मंजूर निधीतून विकासकामे पूर्ण करावीत, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी दिले.
मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली खातेप्रमुख व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी होर्तीकर यांनी कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. होर्तीकर म्हणाल्या की, आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी उरल्याने सर्व खातेप्रमुखांनी तातडीने कामाचे नियोजन करत विकास कामांसाठी निधीचा योग्य तो विनियोग करावा. विकासकामांत कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी इतरही काही मुद्यांवर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याची खरेदी करताना यापुढे स्थानिक बाजारपेठेतून दराची खात्री करुन घेऊन मगच प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सभापती गजानन कोठावळे, सभापती पपाली कचरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दराची चौकशी : त्यानंतरच साहित्य खरेदी
जिल्हा परिषदेत सध्या गाजत असलेल्या शिलाई यंत्र खरेदी घोटळ्याच्या आरोपावरुन गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत लाभार्थ्यांसाठी साहित्याची खरेदी करताना स्थानिक बाजारपेठेत त्या साहित्याच्या दराची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. दराची खात्री करुनच प्रस्ताव सादर करण्याचा आदेशही देण्यात आले. या निर्णयामुळे प्रशासन व पदाधिकारीही सतर्क झाले आहेत.