कवलापूर पाणी योजनेचे जॅकवेल गतीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:59+5:302021-01-22T04:24:59+5:30
सांगली : कवलापूरची पाणी योजना गतीने मार्गी लागण्यासाठी कसबे डिग्रज हद्दीतील जॅकवेलचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ...
सांगली : कवलापूरची पाणी योजना गतीने मार्गी लागण्यासाठी कसबे डिग्रज हद्दीतील जॅकवेलचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभेत देण्यात आले. जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास तत्काळ सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यासही सांगण्यात आले.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. कवलापूर पाणीयोजनेसाठी कसबे डिग्रज हद्दीत कृष्णा नदीत जॅकवेल उभारण्यात येणार आहे. तिचे काम गतीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाघवाडी, जांभुळवाडी व विट्ठलवाडी गावांचा समावेश जीवन प्राधिकरण योजनेत करण्याचेही ठरले. कार्वे (ता. खानापूर) येथील बंधाऱ्याचे काम बरेच रखडल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. ठेकेदाराने ते आठवड्यात सुरू केले नाही तर त्याच्यावर कारवाईचा निर्णय झाला.
स्वच्छ भारत मिशनच्या सांडपाणी व्यवस्थापन ॲपमध्ये ७९ गावांचा समावेश अद्याप झालेला नाही, ते काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.
चौकट
अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
बैठकीला विनापरवानगी अनुपस्थित असणारे ताकारी, म्हैसाळ व टेंभू योजनांचा कार्यकारी अभियंता तसेच वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्याचे आदेश अध्यक्षा कोरे यांनी दिले.
------------------