वारणालीतील रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:32+5:302021-06-24T04:19:32+5:30
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना बुधवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली. वारणाली ...
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना बुधवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली.
वारणाली येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे. आयुक्त कापडणीस व नगरसेवक विष्णू माने यांनी या कामाची पाहणी केली. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना ही जागा निश्चित करून त्या जागेवर उभारण्यात येणारा हॉस्पिटलचा आराखडा तसेच त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले होते. महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यावर हॉस्पिटलची जागा वारणाली की वाघमोडेनगरमध्ये असावी यावरून वाद रंगला. आयुक्त कापडणीस यांनी भाजपने केलेला वाघमोडेनगर जागेचा ठराव विखंडित करण्याची शिफारस शासनाकडे करून वारणालीतच हॉस्पिटल करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्याला शासनानेही मान्यता दिली. दरम्यान जागेच्या मूळ मालकाने न्यायालयात दावा दाखल केला होता. दरनिश्चिती आणि कार्यारंभ आदेशावरूनही न्यायालयात दावा दाखल केला होता. या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होत आहे.
कापडणीस यांनी जागेस भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते. दोघांनीही हॉस्पिटलचे काम करणारे ठेकेदार अभय पाटील यांना जलदगतीने काम करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी नगर अभियंता बी. आर. पांडव, नगररचनाकार आर. व्ही काकडे, शाखा अभियंता अल्ताफ मकानदार, अशोक कुंभार, आदी उपस्थित होते.