विसापूर-पुणदी योजना पूर्णत्वाकडे
By Admin | Published: July 16, 2014 11:37 PM2014-07-16T23:37:05+5:302014-07-16T23:41:09+5:30
जुलैअखेर चाचणी : तासगाव पूर्व भागाला लाभ
मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी गावांना शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या विसापूर-पुणदी उपसा योजनेचे काम पूर्णत्वास आलेले आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेची चाचणी घेण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेतील पूर्ण पाईपलाईन, सर्व पंपगृहे, तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर तासगाव पूर्व भागातील गावांना लाभ होणार आहे.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी असणारी ही एक अद्ययावत योजना आहे व अतिशय जलदगतीने ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. टेंभू योजनेंतर्गत असणारी विसापूर व पुणदी उपसा सिंचन योजना ही शेतीच्या पाण्यासाठी दुष्काळी भागासाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे. या भागातील दुष्काळ हटविण्यासाठी ही एक चांगली सिंचन योजना असणार आहे. सातारा जिल्ह्यातील टेंभू, धोम व कण्हेर या धरणांचे पाणी या योजनेतून पेड, सिध्देवाडी या तलावात येऊ शकते. टेंभू योजनेतील तासगाव तालुक्यासाठी राखीव असलेले पाणी आरफळ कालव्यातून आणले जाणार आहे व या योजनेतून बंद जलवाहिनीद्वारे पूर्व भागातील गावांना दिले जाणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजनेसाठी जवळपास ३५0 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
विसापूर उपसा सिंचन योजनेत १३ गावांचा समावेश आहे, तर पुणदी उपसा योजनेत १३ गावांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पूर्व भागातील २६ गावांतील ७७0 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेतून सर्वात जास्त हातनूर, तर सर्वात कमी लाभ ढवळी या गावाला होणार आहे. टेंभू योजनेतून २ टीएमसी पाणी या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच उरमोडी, तारळी धरणातील पाणी या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे.
या योजनेला जून २0११ मध्ये शासनाने तत्त्वत: मान्यता दिली होती. या योजनेचा प्रारंभ जानेवारी २0१३ मध्ये करण्यात आला होता. गेल्यावर्षी सुरू असलेले काम अवघ्या सोळा महिन्यात पूर्णत्वास आलेले आहे. सर्व पंपगृहाची कामे पूर्ण झाली आहेत. विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. ३० जुलैपर्यंत या योजनेची चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
विसापूरअंतर्गत येणारी गावे
गावाचे नाव क्षेत्र हेक्टरमध्ये
हातनूर १0१४
आरवडे ६१५
हातनोळी ६0६
गोटेवाडी ४८६
मांजर्डे ४७२
विसापूर ४३२
पेड २४८
धामणी १६७
पाडळी १५८
गौरगाव १५२
वंजारवाडी २५
ढवळी ७
बोरगाव २६
पुणदीअंतर्गत येणारी गावे
गावाचे नाव क्षेत्र हेक्टरमध्ये
सावर्डे ६१0
मणेराजुरी ६१0
पुणदी ४८९
बस्तवडे ३८९
बलगवडे ३६२
खुजगाव २0५
डोर्ली १८७
वाघापूर १५२
कौलगे ११६
योगेवाडी १0३
भैरववाडी ७३
चिंचणी २६
लोटे गणेशवाडी२१