‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By Admin | Published: January 10, 2017 11:20 PM2017-01-10T23:20:47+5:302017-01-10T23:20:47+5:30
माळवाडी घटनेचा निषेध : ग्रामीण भागात कडकडीत; १३ जण ताब्यात
सांगली : माळवाडी-भिलवडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या सांगली जिल्हा बंदला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सांगलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध फेरी काढताना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोपावरून शहर पोलिसांनी १३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
गेल्या आठवड्यात माळवाडीमध्ये आठवीत शिकणारी मुलगी आईशी भांडण झाल्याने रात्री घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नव्हती. दुसऱ्या दिवशी तिचा गावातच पलूस-तासगाव रस्त्यावरील धान्य गोदामाजवळ मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन तपासणीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी बंद, निषेध मोर्चे निघाले. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला.
मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकऱ्यांनी सकाळी अकरा वाजता सांगली शहरातून निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केले. राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, तानाजी चौक, कर्नाळ रस्ता, बालाजी चौक, हरभट रस्ता, शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता या मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. दुपारपर्यंत सर्व पेठ बंद होती. बंदचे आवाहन करताना कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप करून शहर व विश्रामबाग पोलिसांनी अनंत रामचंद्र सावंत (वय २८, रा. उत्तर शिवाजीनगर), योगेश प्रकाश सूर्यवंशी (२७, वखारभाग), प्रशांत शंकर भोसले (३४, पंचशीलनगर, सांगली) यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना दुपारी ताकीद देऊन सोडून देण्यात आले. यामध्ये महिला, तरुण व तरुणींचा समावेश होता. सायंकाळनंतर शहरातील व्यवहार सुरळीत सुरु झाले. शहर परिसरातील माधवनगरसह अन्य गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यात इस्लामपूर, विटा, खानापूर, शिराळा, आटपाडी, जत, आष्टा, कुंडल, माधवनगर, बुधगाव, दिघंची, खंडेराजुरी, ढालगाव, मिरज, बेडग, नरवाड, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव या गावांत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केले जात होते. मुलीवर अत्याचार व तिचा खून करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.