कचऱ्यापासून खतनिर्मिती; सांगलीत कचऱ्याचे डंपिंग होतेय बंद, डेपोतून गायब होतोय दुर्गंध
By शीतल पाटील | Published: August 14, 2023 05:17 PM2023-08-14T17:17:48+5:302023-08-14T17:18:20+5:30
समडोळी डेपोतील ३५ टक्के तर बेडगमधील ८५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट
शीतल पाटील
सांगली : महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे संकलन करायचे आणि ते समडोळी, बेडग डेपोवर डंपिंग करायचे, असा पायंडा गेली ३० वर्षे सुरू होता. त्यामुळे या दोन्ही डेपोवर लाखो टन कचरा पडून होता. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा पावले उचलली; पण अडथळ्यांची शर्यत प्रशासन पार करू शकले नाही. आता मात्र या दोन्ही डेपोवरील चित्र पालटले आहे. घनकचरा प्रकल्पांच्या मंजुरीनंतर समडोळी डेपोवरील ३५ टक्के तर बेडग डेपोवरील ८५ टक्के जुन्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात जवळपास नऊ लाख घनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. कित्येक वर्षानंतर या दोन्ही डेपोने मोकळा श्वास घेतला आहे.
सांगलीतील कचरा समडोळी हद्दीतील डेपोवर तर मिरज व कुपवाडचा कचरा बेडग हद्दीतील डेपोवर डंपिंग केला जात होता. गेल्या तीस वर्षांत समडोळी डेपोवर सहा लाख ५४ हजार घनमीटर तर बेडग डेपोवर तीन लाख सात हजार घनमीटर असा नऊ लाख ६१ घनमीटर कचरा पडून होता. डेपो परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अनेकदा कचरा जाळल्याने धुराचे लोट तयार होऊन प्रदूषणात वाढ झाली होती. भटक्या कुत्र्यांनी समडोळी, बेडग परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. कचरा डेपो बंद करण्यासाठी आंदोलनेही झाली. अखेर आयुक्त सुनील पवार यांनी रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावला.
नव्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्यासाठी ४३ कोटी तर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३६ कोटींची निविदा मंजूर होऊन ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांत या दोन्ही डेपोचा कायापालट झाला आहे. बेडग येथील तीन लाख घनमीटर कचऱ्यापैकी दाेन लाख ५३ हजार घनमीटर तर समडोळी येथील सहा लाख ५४ हजार घनमीटरपैकी दाेन लाख ३० हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही डेपोंनी ३० वर्षांनंतर मोकळा श्वास घेत आहेत.
चार टप्प्यांत होते सेग्रिगेशन
जुन्या कचऱ्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया केली जाते. पहिल्यांदा कचरा जेसीबीच्या साहाय्याने यंत्रात टाकला जातो. पहिल्या टप्प्यात ४०० मिलिमीटरवरील कचऱ्याचे सेग्रिगेशन केले जाते. दुसऱ्या टप्प्यात ८० ते ४०० मिलिमीटर, तिसऱ्या टप्प्यात २० ते ८० मिलिमीटर आणि चौथ्या टप्प्यात २० मिलिमीटर आतील कचऱ्याचे सेग्रिगेशन होते. या साऱ्या प्रक्रियेत दगड, प्लास्टिक वेगवेगळे केले जातात. शेवटच्या टप्प्यात खतनिर्मिती होते.
प्रक्रियेनंतर काय होते?
कचऱ्यामधील ज्वलनशील क्षमता असणारे घटक बाजूला केले जातात. याचा वापर सिमेंट कंपन्या, को-जनरेशन प्लॅँटमध्ये बाॅयलर पेटविण्यासाठी होते. सध्या जे. के. सिमेंट, दालमिया सिमेंट यांना हा ज्वलनशील कचरा पुरविला जात आहे.
या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना माफत दरात खत दिले जात आहे.
बांधकामाचा राडारोडा, दगड, खडी, माती यांचा वापर जमिनीचा भराव करण्यासाठी केला जात आहे.
प्लास्टिक, रबर, ग्लास, इत्यादी घेऊन रॅक स्पीकर या कंपनीला दिले जात आहेत.
दररोज चार हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया
गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दररोज चार हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. दिवसातील १८ तास कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू असते. येत्या दोन ते तीन महिन्यांत दोन्ही डेपोंवरील जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
थर्ड पार्टी ऑडिटसाठी एजन्सी नियुक्त
या प्रकल्पाच्या तांत्रिक मूल्यमापनासाठी शासनाच्या नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, नागपूर यांची, तर थर्ड पार्टी ऑडिटसाठी जिजाऊ टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पामुळे जुन्या कचऱ्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. त्यानंतर दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. गेल्या तीस वर्षांचा प्रश्न निकाली निघणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून महापालिकेच्या घंटागाडीकडे द्यावा. - सुनील पवार, आयुक्त, महापालिका