घनकचरा आराखड्यावर विचारमंथन
By admin | Published: July 3, 2016 12:16 AM2016-07-03T00:16:48+5:302016-07-03T00:16:48+5:30
पुण्यात बैठक : परिपूर्ण प्रकल्प आराखडा सादर होणार
सांगली : घनकचरा प्रकल्पाविषयी हरित न्यायालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे महापालिकेने अद्याप अनेक गोष्टींची अंमलबजावणी केलेली नाही. याशिवाय कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी झाली, याविषयीचा उल्लेख आराखड्यात नसल्याची बाब यासंदर्भात नियुक्त तज्ज्ञ समितीने महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासमोर शनिवारी पुण्यातील बैठकीत मांडली. सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून परिपूर्ण आराखडाच हरित न्यायालयासमोर सादर केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
घनकचरा प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक समितीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. यावेळी आयुक्तांसह उपायुक्त सुनील पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, पवई आयआयटीचे डॉ. गर्ग, तसेच तांत्रिक समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
आराखड्यात न्यायालयीन सूचनांप्रमाणे कोणकोणत्या गोष्टींची अंमलबजावणी झालेली आहे, त्याबाबतचा उल्लेख करण्यात यावा, अशी सूचना त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीने शनिवारी पुण्यातील बैठकीत केली. आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन लवकरच परिपूर्ण अहवाल तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)