Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

By अविनाश कोळी | Published: April 19, 2023 11:57 AM2023-04-19T11:57:32+5:302023-04-19T12:41:59+5:30

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी

Concern over pollution of Krishna river in Sangli | Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णेचा उगम पश्चिम घाटात झाला असला तरी याच उगमस्थानापासून काही अंतरापर्यंतच तिची शुद्धता जिवंत राहते. त्यानंतर नदीकाठची शेकडो गावे, साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योग यांच्या माध्यमातून या पाण्यात विष कालवले जाते. केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध अभ्यास गट, संस्थांनी तयार केलेल्या आजवरच्या अहवालात कृष्णा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली असतानाही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही.

कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून उगम पावल्यानंतर १६० किलोमीटर अंतर कापून सांगली जिल्ह्यात येते. सांगली जिल्ह्यात ती १३० किलोमीटर वाहत कर्नाटकात जाते. सांगली जिल्ह्यातील १३० किलोमीटर अंतरातच १०४ गावे, एक महापालिका व औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी या नदीत सोडण्यात येते. प्रदूषणातून नदीच्या नरडीचा घोट घेताना त्याचे दुष्परिणाम नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. गेल्या चाळीस वर्षांत प्रदूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण कृष्णाकाठी वाढल्याचा निष्कर्षही एका अहवालातून पुढे आला आहे. तरीही शासन व प्रशासन निद्रावस्थेत आहे.

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी

कृष्णा, वारणा नदीपात्रात तब्बल १६० गावांचे दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांची संख्या १०४ च्या घरात आहे. जिल्ह्यातील १६० गावांमधून जेवढे सांडपाणी दररोज नदीत मिसळते, त्याहून अधिक सांडपाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातून कृष्णा नदीत मिसळते. महापालिका क्षेत्रातून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळत आहे.

नदीत सांडपाणी सोडणारे कारखाने

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रेड, ऑरेंज व ग्रीन अशा गटांतील ११ हजार ८९४ कारखान्यांचे १ लाख ३३ हजार ५८१ क्युबिक मीटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते.

रसायनयुक्त शेतीचाही परिणाम

सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यात १० लाख २१ हजार ९७९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून तिन्ही जिल्ह्यांत ५ लाख ८३ हजार ७८४ टन खतांची विक्री होते. प्रतिहेक्टर सरासरी १.७५ टन रासायनिक खतांचा वापर होतो, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.

पाण्याची अवस्था अन् वाढलेले आजार

कृष्णेच्या पाण्यातील जैविक ऑक्सिजन म्हणजेच बीओडी, बॅक्टेरिया, क्षारता यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो, कावीळ व पाण्यातून होणाऱ्या अन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे.

प्रदूषणात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कृष्णा नदीच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास कर्नाटकात सर्वाधिक ४४ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणात २९ टक्के तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ २७ टक्के आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ कमी असूनही प्रदूषणातील महाराष्ट्राचा वाटा अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे.

कृष्णा खोऱ्यातील गावे, शहरे

जिल्हा - गावे
सातारा - १२०७
सांगली - ४७६
कोल्हापूर - ८५३
(कोल्हापुरातील संख्या पंचगंगाकाठची आहे)
 

Web Title: Concern over pollution of Krishna river in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.