सांगलीतील चार लाखांवर लाभार्थ्यांचा शिधाचा ‘आनंद’ हरवला, शासनाने गुपचुपच योजना बंद केली की काय?
By अशोक डोंबाळे | Updated: April 15, 2025 17:27 IST2025-04-15T17:27:40+5:302025-04-15T17:27:56+5:30
गौरी-गणपतीपासून लाभच नसल्यामुळे रेशनकार्डधारक चिंतेत

सांगलीतील चार लाखांवर लाभार्थ्यांचा शिधाचा ‘आनंद’ हरवला, शासनाने गुपचुपच योजना बंद केली की काय?
अशोक डोंबाळे
सांगली : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांचे तोंड गोड व्हावे, या उद्देशाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची योजना सुरू केली होती. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना साडीवाटप केले. परंतु, जिल्ह्यातील चार लाख १२ हजार २८३ लाभार्थ्यांना गौरी-गणपतीपासून आनंदाच्या शिधाचे वाटपच झालेले नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली की काय? अशी शंका लाभार्थी उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यातील चार लाख १२ हजार २८३ रेशनकार्डधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोविडपासून मोफत धान्य दिले जाते. महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक लिटर पामतेल देण्यात येत होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात अवघ्या १०० रुपयांत गोरगरिबांच्या घरी गोडधोड बनत होते.
परंतु, लाडकी बहीण योजना अमलात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक योजनांचा निधी तिकडे वळवला आहे. त्याचा फटका आता शिधापत्रिकाधारकांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गौरी-गणपतीपासून आनंदाचा शिधा रेशन दुकानावर आलाच नाही. त्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शासनाने फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यातही अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे साडीवाटप करण्यात आले नाही.
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. परंतु, अद्यापही रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यामुळे शासनाने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना गुंडाळली की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्ह्यातील आनंदाचा शिधाचे पात्र लाभार्थी
तालुका - रेशनकार्डधारक
मिरज - १०१५८७
क. महांकाळ - २४०७२
जत - ५२९४२
आटपाडी - २३१८०
कडेगाव - २५५४०
खानापूर - २७५८८
तासगाव - ४२१७२
पलूस - २८१२६
वाळवा - ६०७००
शिराळा - २६३७६
एकूण - ४१२२८३
शासनाकडून आदेश नाहीत
आनंदाचा शिधा हा गौरी-गणपतीवेळी आला होता. हाच शिधा पुढील काही दिवस वाटप करण्यात आला होता. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा अद्याप आलेला नाही. त्याबाबत शासनाचे आदेशही नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.