गायन, वादनाने रंगविली संगीत मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:32 PM2019-10-06T23:32:00+5:302019-10-06T23:32:06+5:30
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात गायत्री पंडितराव - आठल्ये, स्वराली पणशीकर, पंडित ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय गायन ...
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात गायत्री पंडितराव - आठल्ये, स्वराली पणशीकर, पंडित ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय गायन व पंडित मिलिंद रायकर - यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन सहवादन झाले. गायन-वादनाने रंगलेल्या या मैफलीस श्रोत्यांची दाद मिळाली.
गायत्री पंडितराव - आठल्ये यांच्या गायनाने संगीत सभेचा प्रारंभ झाला. आठल्ये यांनी राग मधुवंती आळविला. त्यांना मुकेश श्रीखंडे यांनी तबलासाथ, तर संदीप तावरे यांनी हार्मोनियमसाथ केली. आठल्ये यांनी विलंबित एकताल ‘साचो तेरो नाम’ द्रुत त्रितालात ‘मोरे करतार’, एकतालात ‘जय जय दुर्गेमाता, नारायणा रमा रमना’ या चीजा गायिल्या. तसेच पंडित मिलिंद रायकर - यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग पुरिया कल्याण आळविला. त्यांनी व्हायोलिनवर आलाप जोड यासह विविध स्वरछटा सादर करताना गायकी अंगाने व्हायोलिनवादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तेजोवृष जोशी यांनी तबलासाथ केली.
यश कोल्हापुरे यांचे शास्त्रीय गायन झाले. कोल्हापुरे यांनी राग हमीर आळविला. ‘चमेली फुली चंपा’ हा झुमरा, तर एकतालात ‘तेरे कारण मेरे आवि, नार वे ठेर जा’ हा टप्पा, ‘उद तन देरे ना’ हा तराणा, ‘तुम साची कहो’ हा दादरा त्यांनी गायिला. त्यांना अमेश देशपांडे यांनी तबलासाथ व संदीप तावरे यांनी हार्मोनियमसाथ केली.
मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले.