सांगलीत वाहतूक सुरक्षा अभियानाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:46 AM2021-02-18T04:46:36+5:302021-02-18T04:46:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या महिन्याभरापासून वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे जनतेत प्रबोधन व्हावे व त्यांना नियमाबाबत सजग करण्यासाठी सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या महिन्याभरापासून वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे जनतेत प्रबोधन व्हावे व त्यांना नियमाबाबत सजग करण्यासाठी सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाचा बुधवारी समारोप झाला. जिल्हा पोलीस दल व प्रादेशिक वाहन विभागातर्फे या ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रुमख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरटीओ व वाहतूक शाखेच्यावतीने वाहतूक सुरक्षा अभियानात महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाहनचालकांना नियमांची माहिती करून देणे व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यास जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळाला होता.
पोलीस मुख्यालयात झालेल्या समारोप कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परेड संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली व कवायतीतून वाहतुकीचे नियंत्रण इशारे सादर केले. यावेळी वाहतूक सुरक्षा अभियानास सहकार्य करणाऱ्या वाहतूक संघटना, रिक्षा संघटना व प्रबोधनाचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.