शेडगेवाडीच्या बोगद्यात काँक्रिटीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:56+5:302021-06-06T04:19:56+5:30
शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील कालव्याच्या बोगद्यात काँक्रिटीकरण सुरू असून, अनेक वर्षांचा प्रश्न निकाली निघणार आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड ...
शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील कालव्याच्या बोगद्यात काँक्रिटीकरण सुरू असून, अनेक वर्षांचा प्रश्न निकाली निघणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील वारणा डाव्या कालव्यातील बोगद्यात काँक्रिटीकरण सुरू असून, तेथे आता पाणी साठण्याची समस्या राहणार नसल्याने प्रवासी आणि वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कऱ्हाड, शिराळ्याहून चांदोली धरण परिसरात शेडगेवाडीमार्गे जावे लागते. तेथे राज्यमार्गावरून आडवा वारणा जलसेतू गेला आहे. त्या जलसेतूखाली राज्यमार्गावर बोगदा असून, तेथे नेहमी पाणी साचते. त्यामुळे येथून प्रवास करण्यात अडथळा येतो. या बोगद्यात साचणाऱ्या पाण्यात दररोज लहान- मोठे अपघात घडत असतात. कालव्याच्या गळतीचे पाणी बोगद्यात साठून रस्ता खराब झाला आहे. कालव्याच्या निर्मितीपासून आजअखेर अशीच परिस्थिती आहे. साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शेडगेवाडी फाट्यापर्यंत भूमिगत गटार तयार करण्यात आले असले तरी या गटारात कचरा साठत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. साठलेल्या पाण्याखालील रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते.
येथील कालव्याची गळती काढण्याची व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला आहे. बोगद्यातील संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रस्त्याची उंची वाढेल आणि त्यावर पाणी साठणार नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल, असे सांगितले जात आहे.